पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून इराणी वस्तीत दोन गटात पोलिसांसमोर हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 18:58 IST2021-04-26T18:57:36+5:302021-04-26T18:58:09+5:30
Crime News : याप्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून इराणी वस्तीत दोन गटात पोलिसांसमोर हाणामारी
कल्याण - टिटवाळा नजीक असलेल्या आंबिवली येथील इराणी वस्ती कायमच गुन्हेगारीमुळे चर्चेत असते. रविवारी संध्याकाळी 15 जणांच्या टोळक्यांनी हत्यारांसह कौसर युसुफ जाफरी यांच्यासह तीन ते चार जणांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून ही हाणामारी झाली असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या समक्ष ही हाणामारी झाली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कौसर जाफरी ही आंबिवली स्थानकाजवळील मस्जिद परिसरातील इंदिरानगर येथे राहते. तू सल्वी युसुफ सय्यद इराणी सोबत का फिरतेस तसेच त्याच्यासोबत का राहते ? असा सवाल इराणी वस्तीत राहणारा लाला समीर इराणी याने कौसरला विचारला होता. यावर सल्वी माझा मित्र असून मी कोणाबरोबर पण फिरेल. तू विचारणारा कोण? असे उत्तर कौसरने दिले. या उत्तराचा राग आल्याने आरोपी लाला याने इतर चौदा जणांच्या साथीने तलवारीचा धाक दाखवत भर वस्तीत चौघांना गंभीर जखमी केले. लाला याने कौसर हिच्यावर देखील तलवारीने हल्ला करायचा प्रयत्न केला मात्र तिने हा वार चुकवला. हा सर्व प्रकार सुरू असताना पोलीस देखील उपस्थित होते. याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात कौसर हिने 15 जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान सल्वी हा पोलिसांचा खबरी असल्याचा देखील दाट संशय हल्लेखोरांना होता अशी चर्चा आहे. इराणी वस्तीतील सर्व खबरी सल्वी हा पोलिसांपर्यँत पोहचवत असल्याची चर्चादेखील इराणी वस्तीत होती. या सर्व प्रकारामुळे इराणी वस्ती पुन्हा एकदा चर्चेला आली आहे.