Video: राज्यभर लॉकडाऊन; नागपुरात हुक्का पार्लरमध्ये तरुण, तरुणीही झिंगलेल्या अवस्थेत सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 00:50 IST2021-05-28T23:55:11+5:302021-05-29T00:50:05+5:30
hookah parlor opens in Nagpur: शासनाने यापूर्वीच हुक्का पार्लर वर बंदी घातली आहे. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे हॉटेल तसेच रेस्टोरेंटही ग्राहकांसाठी बंद करण्यात आले आहे. कोणत्याही ठिकाणी गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे.

Video: राज्यभर लॉकडाऊन; नागपुरात हुक्का पार्लरमध्ये तरुण, तरुणीही झिंगलेल्या अवस्थेत सापडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाने बंदी घातली असतानादेखील बिनधास्त सुरू असलेल्या शहरातील दोन हुक्का पार्लरवर पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी रात्री छापे घातले. या छाप्यात दोन्ही ठिकाणी एकूण २२ तरुण-तरुणी हुक्याचा धुर उडविताना आढळले. (Nagpur police raids on two hookah parlor )
शासनाने यापूर्वीच हुक्का पार्लर वर बंदी घातली आहे. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे हॉटेल तसेच रेस्टोरेंटही ग्राहकांसाठी बंद करण्यात आले आहे. कोणत्याही ठिकाणी गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, शहरातील अंबाझरी तसेच सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांना मिळाली. त्यांनी आपल्या विशेष पथकाला एकाच वेळी दोन्ही ठिकाणी छापे घालण्याचे आदेश दिले.
त्यानुसार शुक्रवारी रात्री अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरतनगर मध्ये हवेली कॅफे नामक हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा घातला. येथे कॅफे मालक प्रेम जोरणकर आणि प्रीतम यादव त्याचे दोन कर्मचारी आणि सात तरुण तरुणी पोलिसांनी ताब्यात घेतले. येथून रोख रक्कम, हुक्का फ्लेवर, पॉट आणि अन्य साहित्य असा एकूण एक लाख, १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्याचप्रमाणे सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फ्युजन हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा घातला. तेथे ११ तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले. त्या ठिकाणी वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरू होती.
तरुणीही हुक्क्याच्या धुरात
या दोन्ही ठिकाणी तरुणांसोबतच तरुणीही मध्य हुक्क्याच्या धुरात झिंगत असल्याचे चित्र पोलिसांना दिसले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मात्र त्या सर्वांची नशा उतरली होती.