माजी नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड; असा रचला सापळा
By धीरज परब | Updated: January 25, 2023 21:34 IST2023-01-25T21:32:07+5:302023-01-25T21:34:13+5:30
भाईंदर पूर्वेच्या गोडदेव - फाटक मार्गावर असलेल्या अन्ना पॅलेस या ऑर्केस्ट्रा बारमध्ये बार मधील गायिकांकडून अश्लील नाच करवून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला मिळाली होती.

माजी नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड; असा रचला सापळा
मीरारोड - भाईंदर पूर्वेचे भाजपचे माजी नगरसेवक गणेश शेट्टी यांच्या अन्ना पॅलेस या ऑर्केस्ट्रा बारमध्ये बेकायदेशीरपणे अश्लील नाच चालत असल्याप्रकरणी पोलिसांनी धाड टाकून गुन्हा दाखल केला आहे.
भाईंदर पूर्वेच्या गोडदेव - फाटक मार्गावर असलेल्या अन्ना पॅलेस या ऑर्केस्ट्रा बारमध्ये बार मधील गायिकांकडून अश्लील नाच करवून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला मिळाली. उपायुक्त अविनाश अंबुरे व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर अहिरराव सह उमेश पाटील, सम्राट गावडे, अश्विनी भिलारे यांच्या पथकाने सापळा रचला. बोगस गिऱ्हाईक पाठवून खात्री होताच २३ जानेवारीच्या मध्यरात्री पोलीस पथकाने छापा टाकला. बारमध्ये सिंगर म्हणून ठेवलेल्या तरुणींकडून अश्लील नाच करवून घेतला जात होता.
छाप्यात रोख १०,५२० रुपये, चित्रीकरण केलेली क्लीप जप्त करुन नमुद बारचा रोखपाल, चालक, ८ वेटर, १ पुरुष गायक अश्या ११ जणांसह बार मालक वर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी देखील सदर बार वर पोलिसांनी अनेकवेळा छापेमारी केली असून पिटा सारखे गंभीर गुन्हे गणेश शेट्टी सह संबंधितांवर दाखल आहेत.