'डिजिटल इंडिया'त काय चाललंय! पोलिसांनी ऑनलाइन घेतली दीड कोटींची खंडणी; महाराष्ट्रातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 20:31 IST2025-07-22T20:31:04+5:302025-07-22T20:31:15+5:30

अहिल्यानगरमध्ये फायनान्स कंपनीच्या संचालकाकडून दीड कोटींची ऑनलाईन खंडणी घेणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

Police officer has been suspended for accepting an online extortion of Rs 1.5 crore from a finance company director in Ahilyanagar | 'डिजिटल इंडिया'त काय चाललंय! पोलिसांनी ऑनलाइन घेतली दीड कोटींची खंडणी; महाराष्ट्रातील घटना

'डिजिटल इंडिया'त काय चाललंय! पोलिसांनी ऑनलाइन घेतली दीड कोटींची खंडणी; महाराष्ट्रातील घटना

Ahilyanagar Crime : चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक करणार्‍या ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ कंपनीच्या मुख्य सूत्रधाराला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मात्र तपासादरम्यान, ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक व तीन पोलिसांनी दीड कोटी रुपयांची ऑनलाइन खंडणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी या सर्वांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

शिर्डीच्या ग्रो मोअर या कंपनीचे संचालक व इतरांनी ग्राहकांना गुंतवणुकीचा चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून आठ लाखांना फसवल्याची फिर्याद राहाता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. तपासादरम्यान पोलिसांनी कंपनीचा संचालक व आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे याची चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्याने मोठा गौप्यस्फोट केला. "१५ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव व त्याच्या सोबतच्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी मी दोन भाऊ व मित्रांसोबत नाशिकला गाडीतून जात असताना लोणीजवळ अडवले. तुझ्याकडे आरबीआयचे लायसन्स नसताना जनतेकडून पैसे गोळा करून तू फसवणूक करतो, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो, अशी धमकी या सर्वांनी दिली. या गुन्ह्यातून सुटायचे असेल तर दीड कोटी रुपये रोख स्वरूपात द्यावे लागतील अशी मागणी पोलिसांनी केली," असं भूपेंद्र सावळेने सांगितले.

आपण रोख पैसे देऊ शकत नसल्याचे सावळे पोलिसांना सांगितले. त्यानंतर धाकराव व इतर पोलिस कर्मचारी त्याला अहिल्यानगरला पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये घेऊन आले. तिथे धाकराव यांनी ऑनलाइन दीड कोटी रुपये देण्याची मागणी केली. गुन्ह्यात अडकायला नको म्हणून त्यांनी सांगितलेल्या अकाउंटवर सावळेने दीड कोटी रुपये ट्रान्सफर केले.

सावळेने दिलेली माहिती तपासून पाहिली असता हा सर्व प्रकार घडल्याचे दिसून आले. त्यामुळे तत्काळ धाकराव, पोलिस हेड कॉन्स्टेबल मनोहर सीताराम गोसावी, बापूसाहेब रावसाहेब फोलाणे, गणेश प्रभाकर भिंगारदे यांना निलंबित करण्यात आले आहे. घडलेल्या प्रकाराची चौकशी सुरू आहे. दीड कोटी रुपये कोणत्या खात्यावर गेले, यात आणखी कुणाचा सहभाग आहे हे तपासले जाईल. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असं पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
 

Web Title: Police officer has been suspended for accepting an online extortion of Rs 1.5 crore from a finance company director in Ahilyanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.