पत्नीला मध्यरात्री शेवटचा फोन अन् दारावर धडकले पोलीस; सुवर्णपदक विजेत्या हवालदाराने स्वतःला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:16 IST2025-09-12T13:13:22+5:302025-09-12T13:16:45+5:30

नवी मुंबईत घरगुती वादातून एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःला संपवले.

Police officer end life in Navi Mumbai over a domestic dispute | पत्नीला मध्यरात्री शेवटचा फोन अन् दारावर धडकले पोलीस; सुवर्णपदक विजेत्या हवालदाराने स्वतःला संपवलं

पत्नीला मध्यरात्री शेवटचा फोन अन् दारावर धडकले पोलीस; सुवर्णपदक विजेत्या हवालदाराने स्वतःला संपवलं

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून हा सगळा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे. आत्महत्येपूर्वी पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या पत्नीला शेवटचा व्हिडीओ कॉल केला होता. त्यानंतर त्याने घरातच गळफास लावून स्वतःला संपवलं. पत्नीने शेजारच्यांना भांडणाची माहिती दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह रुग्णालयात पाठवला.

उलवे येथे पत्नीसोबत झालेल्या वादातून सुवर्णपदक विजेत्या पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पत्नीला व्हिडीओ कॉल करून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. स्वप्निल लोहार (वय ३२) असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते सानपाडा पोलीस ठाण्यात हवालदारपदावर कार्यरत होते.

स्वप्निल यांचा काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे पत्नी आठ वर्षाच्या मुलाला घेऊन गावी निघून गेली होती. सध्या ते घरात एकटेच राहत होते. यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. यातूनच त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. लोहार हे उलवे येथील सेक्टर २४ मधील एकनाथ सदन इमारतीत पत्नी आणि मुलासह राहत होते. गुरुवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा फोनवरून वाद झाला, ज्यामध्ये लोहार यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.

फोनवर बोलताना स्वप्निल यांनी पत्नीला मी आत्महत्या करेन असं रागात म्हटलं होतं. त्यामुळे पत्नी घाबरली आणि तिने स्वप्निलच्या सहकाऱ्यांना फोन करुन याची माहिती दिली. सहकाऱ्यांनी उलवे पोलीस स्टेशनला याबाबत कळवलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. उलवे पोलिसांनी स्वप्निलच्या घरी धाव घेतली. दार आतून बंद होते म्हणून त्यांनी ते तोडले आणि आत प्रवेश केला. घरात स्वप्निल यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत होता.

स्वप्निल लोहार यांनी पोलिसांच्या कौटुंबिक मेळाव्यात खेळ मांडला हे गाणे गायले होते. या गाण्यामुळे मेळाव्यास उपस्थित पोलिस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मंत्रमुग्ध झाले होते. गुरुवारी त्यांच्या निधनाची माहिती मिळताच पोलिस खात्यातील अनेकांनी शोक व्यक्त केला.

Web Title: Police officer end life in Navi Mumbai over a domestic dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.