स्टंटबाजी करणाऱ्या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 16:38 IST2019-05-15T16:35:35+5:302019-05-15T16:38:54+5:30
मुलांना समज देऊन सोडले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयात होणार आहे.

स्टंटबाजी करणाऱ्या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पकडले
मुंबई - हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते शिवडी रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलच्या दरवाज्याला लटकून स्टंटबाजी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले. मुलांना समज देऊन सोडले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयात होणार आहे.
दोन अल्पवयीन मुले हार्बर मार्गावरून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या चालत्या लोकलमधून हातपाय बाहेर काढून स्टंटबाजी करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या मुलांचा कृत्यामुळे त्यांचा आणि इतर प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात या अल्पवयीन मुलांविरोधात १२ मे रोजी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यासाठी सीसीटीव्ही फूटेज तपासले. ८ मे रोजी वडाळा रोड ते शिवडी रेल्वे स्थानकांदरम्यान ही मुले स्टंटबाजी करताना आढळून आली.
यातील एक १५ तर दुसरा १४ वर्षांचा आहे. दोन्ही अल्पवयीन मुले धोकादायक स्टंटबाजी करताना दिसून आली. वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल आणि त्यांच्या पथकाने मुलांना ताब्यात घेतले. पोलिसांनी मुलांच्या नातेवाइकांस बोलावून त्यांच्या समोरच मुलांना समज दिली. स्टंटबाजी जीवाला बेतू शकते, याची कल्पना दिली. या प्रकरणावरील सुनावणी न्यायालयात होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Video : चित्तथरारक! आरपीएफ जवानामुळे वाचला धावती लोकल पकडणाऱ्या प्रवाशाचा जीव