बहिणीला पैसे द्यायचे असल्याचे पत्नीची केली हत्या; धुळ्यात अपघाताचा बनाव रचणाऱ्या पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 21:10 IST2025-07-01T21:09:24+5:302025-07-01T21:10:42+5:30
धुळ्यात पत्नीही हत्या करुन अपघाताचा बनाव रचणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली.

बहिणीला पैसे द्यायचे असल्याचे पत्नीची केली हत्या; धुळ्यात अपघाताचा बनाव रचणाऱ्या पतीला अटक
Dhule Crime: घराच्या छतावरुन कोसळून पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगणारा पतीच मारेकरी असल्याची धक्कादायक बाब धुळ्यात उडकीस आली आहे. पतीने पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याचा नरडाणा पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. २५ जून रोजीच्या या प्रकरणात पोलिसांनी रविवारी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. उदय भिल (वय ४९) असे पतीचे नाव असून सुनीता भिल (३३) हे पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र, आता खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
उदय आणि सुनीता यांच्यात नेहमीच वाद होत असत. बहिणीला १२ हजार रुपये देण्याच्या कारणावरून त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. याच वादातून २५ जून रोजी उदयने लाकडी दांडक्याने सुनीताच्या डोक्यात प्रहार केला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती. घटनेनंतर उदयने सुनीताला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याने डॉक्टरांना आणि पोलिसांना ती छतावरून कोसळल्याने जखमी झाल्याचे खोटे सांगितले. त्यानुसार, नरडाणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
सुनीता यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आणि त्यातील माहितीच्या आधारे पोलिसांनी अधिक तपास केला असता, हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. सुनिता भिल या उदय भिल यांच्याकडे पैशांची मागणी करत होत्या. मात्र हे पैसे उदय याला त्यांच्या बहिणीला द्यायचे होते. वारंवार होणाऱ्या या पैशाच्या मागणीमुळे उदय याचा पारा चढला. त्याने लाकडी दांडक्याने सुनीताच्या डोक्यात जोरात प्रहार केला. घाव वर्मी बसल्याने सुनीताचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, नरडाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांनी वाढीव कलमानुसार गुन्हा दाखल करीत उदय भिल याला शोधून काढले आणि त्याला अटक केली. या कारवाईत नरडाणा पोलिस ठाण्याचे प्रभारी नीलेश मोरे यांच्यासह उपनिरीक्षक महाले, सहायक उपनिरीक्षक हेमंत पाटील, अर्पण मोरे, हे.कॉ. सूरज साळवे, राकेश शिरसाठ, सचिन बागुल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.