आई बापाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता म्हणून काकाचं कुटुंब संपवून टाकलं; खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:09 IST2025-02-07T13:09:15+5:302025-02-07T13:09:56+5:30

४ नोव्हेंबरच्या रात्री राजेंद्र गुप्ताची हत्या झाली, त्यानंतर घरातील त्यांची पत्नी नीतू, मुलगा नवनेंद्र, शुभेंद्र आणि मुलगी गौरांगीलाही गोळी मारून ठार केले.

Police arrest Vishal Gupta, the main accused in the Varanasi murder case Rajendra Gupta and Family | आई बापाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता म्हणून काकाचं कुटुंब संपवून टाकलं; खळबळजनक खुलासा

आई बापाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता म्हणून काकाचं कुटुंब संपवून टाकलं; खळबळजनक खुलासा

वाराणसीच्या भेलुपूर येथे ३ महिन्यापूर्वी झालेल्या एकाच कुटुंबातील ५ लोकांच्या हत्येतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेपासून यातील मुख्य आरोपी विशाल गुप्ता फरार होता. पोलिसांनी विशालला त्याचा भाऊ प्रशांतसह अटक केली आहे. हे दोघे भाऊ सीरगोवर्धनच्या लौटूबीर मंदिराजवळ उभे राहून एकमेकांशी बोलत होते. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून दोघांना बेड्या ठोकल्या. या दोन्ही भावांनी आई वडील आणि आजोबाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नियोजनपूर्वक त्यांचे चुलते राजेंद्र गुप्ता आणि संपूर्ण कुटुंबाची हत्या केली.

आरोपींनी पोलीस चौकशीत सांगितले की, १९९७ मध्ये आमच्या आई वडिलांची आणि आजोबांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या काका राजेंद्र गुप्ता यांच्या सांगण्यावरूनच झाली होती. या घटनेनंतर आम्ही दोघे भाऊ नोकरासारखं राजेंद्र गुप्ताच्या घरात राहायचो. २ वर्षापूर्वी राजेंद्र आणि त्यांच्या मुलाने आम्हाला बेदम मारलं होते. अनेक दिवस खोलीत बंद करून ठेवले. त्याचवेळी राजेंद्र गुप्ता आणि त्याच्या कुटुंबाला कायमचं संपवायचं असं विशालने ठरवलं. 

या हत्येसाठी विशालनं बिहारमधून हत्यार आणि मोबाईल सिम कार्ड खरेदी केले. त्यानंतर संधी मिळताच ३ महिन्यापूर्वी राजेंद्र गुप्ताची आणि कुटुंबाची हत्या केली. ४ नोव्हेंबरच्या रात्री राजेंद्र गुप्ताची हत्या झाली, त्यानंतर घरातील त्यांची पत्नी नीतू, मुलगा नवनेंद्र, शुभेंद्र आणि मुलगी गौरांगीलाही गोळी मारून ठार केले. हत्येनंतर दोन्ही आरोपींनी तिथून पळ काढला. त्यानंतर मुगलसराय स्टेशनला पोहचले तिथून पटना, त्यानंतर कोलकाता आणि मुंबई फिरून पुन्हा बनारसला परतले होते. पोलिसांच्या भीतीने आरोपी कधी हॉटेलला थांबले नाहीत, कधी रात्री ते स्टेशनवरच झोपायचे. 

काकाशी बदला मग कुटुंबाला का संपवलं?

पोलिसांनी आरोपीला काकाशी बदला घ्यायचा होता मग काकी आणि भाऊ बहि‍णींना का मारले असा प्रश्न केला. तेव्हा काकी आणि बहिणी काकाला आणि भावाला भडकवायच्या. सुरुवातीपासून ते लोक मला आणि माझ्या भावाला मारहाण करायचे. हळू हळू सर्वकाही ठीक होईल या विचाराने आम्ही गप्प बसायचो. परंतु ते आम्हाला संपवायलाच निघाले होते. अनेकदा आम्हाला गोळी मारून ठार करू अशा धमक्या दिल्या जायच्या असं आरोपींनी चौकशीत सांगितले. 

Web Title: Police arrest Vishal Gupta, the main accused in the Varanasi murder case Rajendra Gupta and Family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.