पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 05:58 IST2025-09-27T05:56:37+5:302025-09-27T05:58:18+5:30
मेहता ब्रिटनचा नागरिक असून गेल्या ३५ वर्षांपासून हाँगकाँगमध्ये राहतो. पीनबी घोटळ्याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात तो आरोपी आहे.

पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
मुंबई - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याशी संबंधित फरार आरोपी नीरव मोदी याचा मेव्हणा मयंक मेहता याला विशेष सीबीआय न्यायालयाने ‘माफीचा साक्षीदार’ म्हणून घोषित केले आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी २२ सप्टेंबरला मेहताच्या माफीच्या अर्जास मान्यता दिली. तो खरी परिस्थिती, तसेच गुन्ह्यात सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीबाबत खुलासा करेल, अशी अट न्यायालयाने त्याला माफीचा साक्षीदार करताना घातली.
माफीच्या आदेशानंतर संबंधित आरोपीला या खटल्यात माफीचा साक्षीदार म्हणून नोंदवले जाईल, असे आदेशात म्हटले आहे. त्याची प्रत शुक्रवारी उपलब्ध झाली आहे. मेहता ब्रिटनचा नागरिक असून गेल्या ३५ वर्षांपासून हाँगकाँगमध्ये राहतो. पीनबी घोटळ्याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात तो आरोपी आहे. हे प्रकरण भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-ब, ४२० , ४०९ (विश्वासघात) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल केलेले आहे. अर्जात मेहताने स्पष्ट केले होते की, त्याला यापूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) दाखल प्रकरणांत माफी देण्यात आली होती आणि त्या प्रकरणातील मूळ गुन्हा सीबीआयने दाखल केला आहे. तो सप्टेंबर २०२१ मध्ये तो स्वेच्छेने भारतात आला होता जेणेकरून तो खटल्याच्या कार्यवाहीत सहभागी होऊ शकेल.
मेहताच्या वकिलाचा युक्तिवाद काय?
मेहताने माफी मागितली असून त्याने सर्व परिस्थितींबाबत सत्य खुलासा करण्याची तयारी दर्शवली आहे, असा युक्तिवाद मेहताचे वकील अनिल देसाई यांनी न्यायालयात केला. सरकारी वकील अरविंद आघाव यांनी या अर्जास हरकत घेतली नाही. यापूर्वीही त्याला अशाच पीएमएलए प्रकरणांत माफी देण्यात आल्याचे आघाव यांनी मान्य केले.
मेहूल चोक्सी व मोदीवर आरोप काय आहेत?
फरार हिरे व्यापारी मेहूल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी हे पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. त्या कोट्यवधी घोटाळ्याची चौकशी सीबीआय व अंमलबजावणी संचालनालय (ईडी) करीत आहे. मुंबईतील पीएनबीच्या ब्रेडी हाउस शाखेतील अधिकाऱ्यांना लाच देऊन लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) आणि फॉरेन लेटर ऑफ क्रेडिट्सचा गैरवपार करून तब्बल १३,००० कोटी रुपयांचा निधी खासगी वापरासाठी वळविल्याचा आरोप चोक्सी व मोदीवर आहे. सध्या चोक्सीविरोधात बेल्जियम न्यायालयात प्रत्यार्पणाची कार्यवाही सुरू आहे, तर नीरव मोदी लंडनमधील तुरुंगात आहे.