मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 13:52 IST2026-04-05T13:50:12+5:302026-04-05T13:52:55+5:30
लोकेश आणि त्याचा साथीदार विकास यांना हँडलरने विशेषतः मुंबईत पाठवले होते. या दोघांना तेथील शोरूम आणि वाहनांना आग लावण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
लखनौ - उत्तर प्रदेशच्या एटीएसनंदहशतवादाचे नवे मॉड्यूल उघड केले आहे. या प्रकरणात आणखी एक नवीन व्हिडिओ पुरावा म्हणून समोर आला आहे. ज्यात थेटपणे सीमेपलीकडे बसलेल्या पाकिस्तानी हँडलर्सच्या कनेक्शनची पुष्टी होते. या व्हिडिओत हँडलर भारतातील युवकांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विध्वंसक कारवायांचे निर्देश देताना दिसतो. तपास यंत्रणांच्या हाती २५ सेकंदाचा एक व्हिडिओ लागला आहे.
या व्हिडिओत पाकिस्तानी हँडलरच्या चेहऱ्यावर काळा चष्मा आणि हातात शस्त्रे दिसतात. व्हिडिओमध्ये तो पापला पंडित आणि नेटवर्कच्या इतर सदस्यांना दहशतवादी कारवाया करण्याचे निर्देश देताना दिसत आहे. एटीएसचा दावा आहे की, अटक केलेले चार आरोपी आणि त्यांचे सूत्रधार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकमेकांशी संवाद साधत होते. या व्हिडिओची नेमकी तारीख आणि तो कोणत्या विशिष्ट उद्देशाने रेकॉर्ड करण्यात आला याची सखोल चौकशी केली जात आहे.
मुंबईत दहशत अन् धार्मिक दंगल भडकवण्याचं षडयंत्र
या तपासात एक अत्यंत गंभीर सत्य समोर आले आहे. या नेटवर्कचा मुख्य उद्देश मुंबईत दहशत पसरवणे हा होता. लोकेश आणि त्याचा साथीदार विकास यांना हँडलरने विशेषतः मुंबईत पाठवले होते. या दोघांना तेथील शोरूम आणि वाहनांना आग लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. या कटामागील मुख्य अजेंडा हिंदू समाजाला लक्ष्य करणे आणि देशात धार्मिक तणाव व भीतीचे वातावरण निर्माण करणे हा होता. या दहशतवादी नेटवर्कने व्हिडिओ कॉलद्वारे या कटाचे नियोजन केले होते. पोलिसांच्या सूत्रांनुसार लोकेश आणि विकास यांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून या नेटवर्कमध्ये सामील करून घेण्यात आले. त्यांना जाळपोळ आणि तोडफोडीची कृत्ये करण्यास प्रवृत्त करण्यासाठी मोठ्या बक्षिसांचे आमिष दाखवले होते. त्यांच्या हँडलरने सुरुवातीला मुंबईतील शोरूम्सना आग लावण्याचे काम दिले होते परंतु मुंबई पोलिसांच्या भीतीने त्यांनी ही मोहीम राबवली नाही.
ट्रेनिंगनंतर मिळाला होता टास्क
हँडलरची काम करण्याची पद्धत एखाद्या कट्टरपंथी दहशतवादी संघटनेसारखी होती. त्याने सर्वात आधी त्याच्या साथीदारांचे ब्रेनवॉश करून त्यांना ट्रेनिंग दिली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना छोटी कामे सोपवण्यात आली. लोकेश आणि विकास यांनाही याच प्रक्रियेतून जावे लागले. छोटी कामे यशस्वीपणे पूर्ण केल्यावर त्यांना मोठ्या घटनांसाठी सूचना देण्यात आल्या. मात्र यूपी एटीएसच्या सतर्कतेमुळे संपूर्ण नेटवर्क वेळेवर उघडकीस आले. मात्र या मोठ्या नेटवर्क आणि आंतरराष्ट्रीय कटाबद्दल स्थानिक पोलिसांना काहीच कल्पना नव्हती. २८ तारखेला जेव्हा एटीएसने ग्रेटर नोएडाच्या बादलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छपराउला गावातून लोकेश आणि विकास या दोघांना अटक केली तेव्हाही स्थानिक पोलिसांना याची काहीच कल्पना नव्हती.