रेमडेसिविरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; रुग्णालयातील वॉर्डबॉय निघाला आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 03:22 PM2021-05-09T15:22:23+5:302021-05-09T15:22:34+5:30

सुनील विजय कचरे, अजय सुरेश फडतरे, प्रवीण दिलीप सापते, निखिल अनिल घाडगे असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

Phaltan police have arrested the accused in the remdesivir case | रेमडेसिविरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; रुग्णालयातील वॉर्डबॉय निघाला आरोपी

रेमडेसिविरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; रुग्णालयातील वॉर्डबॉय निघाला आरोपी

Next

फलटण : फलटण तालुक्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे चार जणांचे रॅकेट फलटण शहर पोलिसांनी पकडून गजाआड केले आहे. मुख्य आरोपी येथील सुविधा हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय असल्याने खळबळ उडाली आहे. सुनील विजय कचरे, अजय सुरेश फडतरे, प्रवीण दिलीप सापते, निखिल अनिल घाडगे असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

फलटण शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना सुनील विजय कचरे हा सुविधा हॉस्पिटलजवळ रेमडेसिविरची बाटली त्यावरील छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने विकत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे साताऱ्यातील औषध निरीक्षक अरुण गोडसे यांना माहिती देऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम यांना बनावट ग्राहक म्हणून पाठविण्याचे ठरले. त्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनची अधिक किमतीने विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांकावर फोन केला. सुनील विजय कचरे याने रेमडेसिविरची एक बाटली असल्याचे सांगून प्रत्येक बाटलीस ३५ हजार रुपये याप्रमाणे विक्री करीत असल्याचे सांगितले. त्यावेळी बनावट ग्राहकाने त्यांच्याकडून एक इंजेक्शन खरेदी करण्यास होकार दर्शविला. फोनवर बोलणाऱ्याने लक्ष्मीनगरमधील मगर हॉस्पिटलच्या पाठीमागे लवकरात लवकर येण्यास सांगितले.

औषध निरीक्षक अरुण गोडसे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक एस. के. राऊळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस सहायक फौजदार एस. एन. भोईटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. पी. ठाकूर, पोलीस नाईक एस. डी. सुळ, एन. डी. चतुरे, व्ही. के. लावंड, पोलीस शिपाई ए. एस. जगताप यांनी तेथे जाऊन सापळा लावला. बोगस ग्राहक असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम यांनी त्यांच्या मोबाइलवरून फोन केला असता त्याने पुढे काही अंतरावर मी एका मोटार सायकलवर बसलेलो आहे, असे सांगितले. तसेच तेथे जाऊन इंजेक्शनला ३५ हजार रुपये लागतील, असे सांगून त्यांचे जवळील इंजेक्शन विकले. यावेळी पोलीस पथक, औषध निरीक्षकांनी छापा टाकला असता संबंधित व्यक्ती पळून जात असताना गराडा घालून पकडले.

त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी सुनील विजय कचरे (वय ३८, रा. नेर, पुसेगाव, ता. खटाव), अजय सुरेश फडतरे (३४, रा. पिंप्रद, ता. फलटण) असे असल्याचे सांगितले. इंजेक्शन कोठून आणले, याबाबत विचारणा केली असता हे प्रवीण मिस्त्री ऊर्फ प्रवीण दिलीप सापते (रा. घाडगेवाडी, ता. फलटण) यांच्याकडून आणली असल्याचे सांगितले. लगेच पोलीस पथक पाठवून प्रवीण सापते यास ताब्यात घेतले असता त्याने इंजेक्शन निखिल अनिल घाडगे (रा. अनपटवाडी) याच्याकडून आणली असल्याचे सांगितले आहे. निखिल घाडगे यालाही अटक केली आहे. 

Web Title: Phaltan police have arrested the accused in the remdesivir case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app