सांभाळता येत नसेल तर पाळता कशाला? श्वानाचा महिलेवर जीवघेणा हल्ला; चेहऱ्यावर पडले ५० टाके

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 10:21 IST2026-01-31T10:08:05+5:302026-01-31T10:21:27+5:30

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर श्वानाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बंगळरुमध्ये घडली.

Pet dog attack in Bengaluru woman who went for a morning walk was subjected to a life threatening attack; 50 stitches on her face | सांभाळता येत नसेल तर पाळता कशाला? श्वानाचा महिलेवर जीवघेणा हल्ला; चेहऱ्यावर पडले ५० टाके

सांभाळता येत नसेल तर पाळता कशाला? श्वानाचा महिलेवर जीवघेणा हल्ला; चेहऱ्यावर पडले ५० टाके

Bengaluru Dog Attack: एका बाजूला पाळीव प्राण्यांविषयीचे प्रेम वाढत असतानाच, दुसरीकडे मालकांच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बंगळुरूच्या एचएसआर लेआउटमधील टीचर्स कॉलनी परिसरात एका पाळीव कुत्र्याने एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरवर अत्यंत भीषण हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर तब्बल ५० हून अधिक टाके घालण्याची वेळ आली आहे.

२६ जानेवारी रोजी सकाळी ६:५० च्या सुमारास ही घटना घडली. सत्यप्रकाश दुबे यांच्या पत्नी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करून घरी परतत होत्या. त्या आपल्या घरासमोर पोहोचल्या असतानाच, शेजारी राहणारे अमरेश रेड्डी यांचा मोठा पाळीव कुत्रा अचानक धावत आला. कुत्र्याचा वेग आणि आक्रमकता इतकी होती की, त्या महिलेला सावरण्याची संधीच मिळाली नाही. कुत्र्याने थेट त्यांच्या गळ्याचा आणि चेहऱ्यावर हल्ला केला.

हल्ल्यामुळे पडले ५० टाके 

हल्ल्याची तीव्रता इतकी भयानक होती की, महिलेच्या मानेला, चेहऱ्याच्या उजव्या भागाला आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर ५० हून अधिक टाके पडले आहेत. "शारीरिक जखमा भरून येतीलही, पण चेहऱ्यावर पडलेले हे व्रण आयुष्यभर राहतील आणि या घटनेमुळे पत्नीला बसलेला मानसिक धक्का अत्यंत मोठा आहे," अशी खंत सत्यप्रकाश दुबे यांनी व्यक्त केली.

वाचवायला गेलेला नागरिकही जखमी

ज्यावेळी कुत्रा महिलेचा लचका तोडत होता, त्यावेळी एका प्रत्यक्षदर्शीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या हिंस्त्र कुत्र्याने त्या व्यक्तीवरही हल्ला करून त्याला जखमी केले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

मालकाचा निष्काळजीपणा भोवला
या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीने एचएसआर लेआउट पोलीस ठाण्यात धाव घेऊन कुत्रा मालक अमरेश रेड्डी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना अशा श्वानांना पट्टा बांधणे बंधनकारक असतानाही मालकाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू केला आहे.

नागरिकांमध्ये संतापाची लाट

रहिवासी भागातील वाढत्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत. "जर मालक इतक्या मोठ्या कुत्र्याला सांभाळू शकत नसेल, तर त्याला मोकळे सोडण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?" असा सवाल दुबे यांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title : लापरवाही! बेंगलुरु में कुत्ते के हमले में महिला को लगे 50 टांके।

Web Summary : बेंगलुरु: एक पड़ोसी के कुत्ते के हमले में एक महिला गंभीर रूप से घायल हो गई। उसके चेहरे और गर्दन पर 50 से अधिक टांके लगे। मदद करने की कोशिश में एक राहगीर भी घायल हो गया। पुलिस मालिक की लापरवाही की जांच कर रही है।

Web Title : Negligence! Dog attack leaves woman with 50 stitches in Bengaluru.

Web Summary : Bengaluru: A woman suffered severe injuries after a neighbor's dog attacked her. She received over 50 stitches on her face and neck. A passerby was also injured trying to help. Police are investigating the owner's negligence.