१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 17:06 IST2025-07-06T17:05:09+5:302025-07-06T17:06:43+5:30
कर्नाटकता बलात्कार पीडितांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावणाऱ्या व्यक्तीने धक्कादायक खुलासे केले आहेत.

१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
Karnataka Crime:कर्नाटकत एका व्यक्तीने केलेल्या काही खुलाशांमुळे सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. कर्नाटकातल्या एका व्यक्तीने बलात्कार झालेल्या तरुणींच्या मृतदेहांना जाळून त्यांची विल्हेवाट लावल्याचा दावा केला आहे. १९९८ ते २०१४ पर्यंत आपण हे काम केल्याचा दावा केला आहे. ११ वर्षांनी या व्यक्तीने स्वतः पोलिसांना या सगळ्या प्रकाराची प्रकाराची माहिती दिली आणि त्याचा गुन्हा कबूल केला. मला हे सर्व करण्यासाठी भाग पाडलं गेलं होतं असं त्याचे म्हणणं आहे. कर्नाटकातील एका धार्मिक स्थळावर सफाई कामगार हा व्यक्ती काम करत होता. त्याने पोलिसांना काही मृतदेह आणि सांगाड्यांचे फोटोही दिले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा आता सखोल तपास सुरु केला आहे.
एका मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर पश्चाताप होत असल्याने आपण गुन्ह्याची कबुली देत असल्याचे या व्यक्तीने सांगितले. बलात्कार पीडितांना न्याय मिळावा म्हणून मी पुढे येण्याचा निर्णय घेतला, असंही त्याने सांगितले. मी अनेक मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे. पण एक मृतदेह जो माझ्या मनातून जात नाही तो म्हणजे एका शाळकरी मुलीचा. माझा सुपरवायझर मला मृतदेह असलेल्या ठिकाणी बोलवायचा. बहुतेक मृतदेह अल्पवयीन मुलींचे होते. ज्या लोकांनी मला हे सर्व करायला लावले ते खूप मोठे लोक आहेत. जर माझ्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी घेतली तर मी सर्वांची नावे सांगू शकतो, असं सफाई कामगाराने म्हटलं.
दुसरीकडे, न्यायालयाकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर धर्मस्थळ पोलीस ठाण्यात सफाई कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बलात्कार झालेल्या मुलींचे मृतदेह जाळणे हा एक अतिशय वेदनादायक अनुभव होता. २०१० मध्ये एका शाळकरी मुलीचा मृतदेह आणण्यात आला होता. तिचे वय १२ ते १५ वर्षांच्या दरम्यान होते. तिचा मृतदेह कल्लेरी येथील पेट्रोल बंकपासून ५०० मीटर अंतरावर होता. तिने शाळेचा गणवेश घातला होता, पण स्कर्ट आणि आतील कपडे गायब होते. मुलीच्या शरीरावर लैंगिक अत्याचाराच्या खुणा होत्या. मला मुलीला तिच्या शाळेच्या बॅगेसह पुरण्यास सांगितले होते, असं सफाई कामगाराने सांगितले.
"असाच प्रकार एका २० वर्षीय तरुणीच्या बाबतीत घडला. तिचा चेहरा अॅसिडने जाळला होता आणि मृतदेह पेपरमध्ये गुंडाळला होता. मला तिचा मृतदेह जाळायला सांगितले. धर्मस्थळमध्य मी बेघर लोक आणि भिकाऱ्यांना मारताना पाहिले आहे. मला यापैकी अनेक मृतदेह पुरण्यास आणि जाळण्यास भाग पाडण्यात आलं. २०१४ मध्ये माझ्या वरिष्ठाच्या ओळखीच्या व्यक्तीने माझ्या घरातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर, मी माझ्या कुटुंबासह धर्मस्थळ सोडण्याचा निर्णय घेतला," असेही सफाई कर्मचाऱ्याने सांगितले.
"हे सगळं घडवून आणणाऱ्यांना शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा आहे. मी एका धार्मिक स्थळी गेलो होतो. तिथे मी शांतपणे मृतांच्या मृतदेहांचे फोटो काढले. मी हे फोटो देतो. मी पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहे. पोलिसांना मी त्या ठिकाणी घेऊन जाईन जिथे मी मृतदेह पुरले आहेत. मी पॉलीग्राफ किंवा इतर कोणत्याही टेस्टसाठी तयार आहे. मी सुप्रीम कोर्टाचे वकील केव्ही धनंजय यांनाही माझ्या तक्रारीची प्रत दिली आहे. जर त्याची हत्या झाली तर ते आरोपींची नावे उघड करतील," असं सफाई कर्मचाऱ्याचे म्हणणं आहे.