पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
By नारायण बडगुजर | Updated: December 15, 2025 21:55 IST2025-12-15T21:53:57+5:302025-12-15T21:55:01+5:30
सहा कोटींच्या मुद्रांक शुल्क फसवणूक प्रकरणी दिवसभर कसून चौकशी

पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: पुण्यातील मुंढवा येथील ४० हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात अखेर अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचा भागीदार असलेला मामेभाऊ दिग्विजय पाटील सोमवारी (१५ डिसेंबर) बावधन पोलिसांसमोर हजर झाला. सकाळपासून बावधन पोलिसांकडून पाटील यांची कसून चौकशी करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया इंटरप्रायजेस एलएलपी कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील याच्यासह जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली महिला शीतल तेजवाणी आणि दस्त नोंदणी करणारे सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांविरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात ६ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. शासनाच्या नियमांनुसार या जमिनीचा खरेदी-विक्री दस्त करताना ५ कोटी ८९ लाख ३१ हजार रुपये इतके मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते. तरीही संशयितांनी संगनमत करून शासनाला देय असलेले सुमारे ६ कोटी रुपये मुद्रांक शुल्क न भरता फसवणूक केली.
या प्रकरणात शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांनी अटक केली. तर, बावधन पोलीसांनी ७ डिसेंबर रोजी या प्रकरणातील संशयित सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू याला भोर येथील राहत्या घरातून अटक केली. तेजवानी आणि तारू हे दोघेही सध्या कोठडीत आहेत. तर, गुन्हा दाखल झाल्यापासून दिग्विजय पाटील सातत्याने पोलिसांसमोर हजर होण्यास टाळाटाळ करीत होता. अखेर सव्वा महिन्यानंतर पाटील स्वत:हून चौकशीसाठी बावधन पोलिस ठाण्यात सकाळी अकराच्या सुमारास हजर झाला.
पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांच्यामार्फत पाटील याची कसून चौकशी करण्यात आली. जमीन खरेदी-विक्री व्यवहार, दस्त नोंदणी याबाबत पोलिसांनी जबाब घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत दिग्विजय पाटील याची चौकशी सुरू होती, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी दिली.
तारूच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ
बावधन पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात कागदपत्रांची तपासणी केली असता या प्रकारणातील दस्त नोंदणी रवींद्र तारू याच्या अधिकारात झालेली असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार, त्याला भोर येथील राहत्या घरातून ७ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तारू याला पौड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तारू याला आठ दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी (दि. १५ डिसेंबर) संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत (दि. १९ डिसेंबर) तारू याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांचा जबाब घेतला. जबाबाचे योग्य विश्लेषण करून पुढील तपासाअंती निर्णय घेतला जाईल.
-विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त