परळीच्या तरुणीची पुण्यात आत्महत्या; सोशल मीडियात उलट-सुलट चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 21:50 IST2021-02-08T21:49:01+5:302021-02-08T21:50:08+5:30
Crime News : वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. तरुणीने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

परळीच्या तरुणीची पुण्यात आत्महत्या; सोशल मीडियात उलट-सुलट चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बीड जिल्ह्यातील परळी येथील एका २२ वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारून पुण्यात आत्महत्या केली. पूजा लहू चव्हाण (वय २२, रा. हेवन पार्क,महंमदवाडी, मूळगाव. परळी, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्माक मृत्यूची नोंद केली आहे.
ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क येथे घडली. दरम्यान, तरुणीने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकेले नाही. परंतु संबंधित तरुणीच्या आत्महत्येवरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, त्याबाबत अधिकृत कोणतीही तक्रार अद्याप मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले की, पूजा महमंदवाडी येथील ‘हेवन पार्क’मधील इमारतीत ३० जानेवारी रोजी मूळ गावाहून स्पोकन इंग्लिशचे क्लासेस करण्यासाठी पुण्यात आली होती, सध्या ती चुलत भाऊ विलास गणेश चव्हाण व एक मित्र अरुण राठोड (रा. बीड) यांच्यासोबत राहत होती, तिचे आईवडील हे गावाकडेच राहतात, रविवारी रात्री पूजा व तिचे दोन मित्रासोबत पार्टी केली.
दरम्यान, सोमवारी दीड वाजताच्या सुमारास तिने अचानक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने चुलत भाऊ व मित्राने तिला रुबी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले, वानवडी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अकस्मात मृत्यू नोंद केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सर्व दृष्टिकोनातून
तपास सुरू केला असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयाता पाठविला. दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृतदेह तरुणीच्या घरच्यांच्या ताब्यात दिला असून त्यांनी अंत्यसंस्कारासाठी पार्थिव गावी नेले आहे. (Parli girl commits suicide in Pune.)
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले की, पूजा पदवीधर असून पुढे कोर्स करण्यासाठी ती चुलत भावाबरोबर पुण्यात आली होती. याबाबत अनेक बाबी चर्चेला जात असल्या, तरी त्याबाबत अद्याप कोणीही तक्रारदार समोर आला नाही. वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून पोलीस तपास करीत आहेत.