पाकिस्तानी गायक राहत अली खान यांना ईडीची नोटीस, परकीय चलन अवैधरीत्या देशाबाहेर पाठवल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 19:02 IST2019-01-30T19:00:27+5:302019-01-30T19:02:08+5:30
२ कोटी देशाबाहेर पाठविल्याचा ईडीचा ठपका

पाकिस्तानी गायक राहत अली खान यांना ईडीची नोटीस, परकीय चलन अवैधरीत्या देशाबाहेर पाठवल्याचा आरोप
मुंबई - पाकिस्तानी प्रसिद्ध सुफी गायक राहत फतेह अली खान याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परकीय चलनाची देशाबाहेर तस्करी केल्याप्रकरणी नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी त्याच्याकडून योग्य खुलासा न केला गेल्यास त्याला अटक होण्याची शक्यता ईडी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानी प्रसिद्ध सुफी गायक राहत फतेह अली खान याला फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट (फेमा) अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राहत फतेह अली खान गेल्या काही वर्षांपासून परकीय चलनाची तस्करी करीत असल्याचे समोर आले आहे. राहत हे सुप्रसिद्ध दिवंगत पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान यांचे भाचे आहेत. २००९ साली लागी तुमसे मन की लगन या गाण्यासह त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने परकीय चलनाच्या माध्यमातून प्रचंड कमाई केली आहे. मात्र, त्याचा कोणताही हिशेब त्याने आयकर विभागाला दिलेला नाही. या चलनाची तो देशाबाहेर तस्करी करीत असल्याचेही आढळून आले आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, राहतने ३ लाख ४० हजार डॉलर कमावले होते. त्यातील २ कोटी बेकायदेशीररित्या भारताबाहेर पाठवले. इतके पैसे त्याने नेमके कसे कमावले आणि भारताबाहेर कुठे आणि का पाठवले, अशी विचारणा ईडीने त्याला केली आहे. राहतने या प्रश्नांची समाधानकारक उत्तर न दिल्यास त्याला तस्करी करण्यात आलेल्या रकमेच्या ३०० टक्के दंड भरावा लागणार असून दंड न भरल्यास त्याला अटक होऊ शकते, अशी माहिती ईडीतील सूत्रांनी दिली. २०११ मध्ये परकीय चलन घेऊन जाताना त्याला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडविण्यात आले होते. त्यावेळी तो मांस निर्यातदार मोइन कुरेशी यांच्या दिल्लीतील घरी एका लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आला होता. याच मोईन कुरेशीकडून लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. राहतच्या मोईन कनेक्शनमुळे त्याच्यावरील संशय आणखी बळावला असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे ईडी अधिकाऱ्याने सांगितले.