संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:24 IST2025-12-25T12:22:28+5:302025-12-25T12:24:45+5:30
आपल्या नातीने दुसऱ्या धर्माच्या मुलाशी लग्न केल्याचा राग मनात धरून, एका आजीने आपल्या केवळ ४० दिवसांच्या 'पणती'ची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

AI Generated Image
रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी आणि माणुसकीला लाजवणारी एक घटना कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. आपल्या नातीने दुसऱ्या धर्माच्या मुलाशी लग्न केल्याचा राग मनात धरून, एका आजीने आपल्या केवळ ४० दिवसांच्या 'पणती'ची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील चेलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तक्रारदार मुलीने एका हिंदू तरुणाशी प्रेमविवाह केला होता. या आंतरधर्मीय विवाहामुळे तिची आजी प्रचंड संतापलेली होती. या रागातूनच तिने आपल्या नातीच्या ४० दिवसांच्या निरागस बाळाचा काटा काढल्याचा आरोप पीडित मातेने केला आहे.
मृत्यू झाला तेव्हा बाळ आजीसोबत एकटंच होतं!
घटनेच्या वेळी ४० दिवसांची चिमुरडी आजीसोबत एकटीच होती. काही वेळाने जेव्हा आई बाळाजवळ आली, तेव्हा तिला बाळ मृतावस्थेत आढळले. घाबरलेल्या आईने आजीला जाब विचारला असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. इतकेच नाही, तर 'पोलीस तक्रार करण्याची काहीच गरज नाही' असे सांगून आजीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. आजीच्या या संशयास्पद वागण्यामुळे मुलीचा संशय बळावला आणि तिने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
पोलिसांची दुहेरी कारवाई
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ पावले उचलली आहेत. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. बाळाचा मृत्यू नेमका कसा झाला, हे पोस्टमार्टम रिपोर्टनंतर स्पष्ट होईल आणि त्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. तर, तक्रारदार मुलगी ही १७ वर्षांची (अल्पवयीन) असल्याने, तिच्याशी लग्न करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही 'ऑनर किलिंग'ची घटना आहे का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. आजीने रागाच्या भरात बाळाचा गळा दाबला की तिला विष दिले, याचा शोध घेतला जात आहे.