मुंबईचा इंजिनीअरच पाठवायचा ‘ती‘ लिंक; ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये ‘पैसे डबल’ करण्याचे आमिष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 07:31 IST2025-11-27T07:31:00+5:302025-11-27T07:31:35+5:30
राजू छिब्बेर यांना २० ते २९ सप्टेंबर २०२५ दरम्यान अज्ञात क्रमांकावरून फोन आला. ‘ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवा, मी दुप्पट करून देतो‘, असे सांगून त्यांच्याकडून काही दिवसांतच विविध खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास भाग पाडले.

मुंबईचा इंजिनीअरच पाठवायचा ‘ती‘ लिंक; ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये ‘पैसे डबल’ करण्याचे आमिष
मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ‘पैसा डबल करून देतो‘ असे आमिष दाखवून तब्बल ५ लाख ७२ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित चार आरोपींना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत फक्त अकाैंट होल्डर्सवर कारवाई होत असताना, त्याच्या पुढच्या साखळीपर्यंत पोहोचण्यास पथकाला यश आले. फसवणुकीसाठी लिंक शेअर करणाऱ्यालाही पथकाने बेड्या ठोकल्या. अक्षय कणसे असे आरोपीचे नाव असून तो मॅकेनिकल इंजिनीअर म्हणून मुंबईत नामांकित कंपनीत नोकरीला आहे.
राजू छिब्बेर यांना २० ते २९ सप्टेंबर २०२५ दरम्यान अज्ञात क्रमांकावरून फोन आला. ‘ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवा, मी दुप्पट करून देतो‘, असे सांगून त्यांच्याकडून काही दिवसांतच विविध खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास भाग पाडले. गुंतवणूक केल्यानंतर पैसे परत न मिळाल्याने फिर्यादींनी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार नोंदविली. ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक शरद देवरे, सहाय्यक फौजदार अशोक कोंडे, पोलिस शिपाई विक्रम सरनोबत, स्वप्निल काकडे या पथकाने त्यांचा शोध सुरू केला.
फसवणुकीची रक्कम बँक ऑफ बडोदाच्या एका खात्यात वळती झाल्याचे आढळताच ते खाते तत्काळ फ्रीज करण्यात आले. केवायसी तपासल्यानंतर खातेधारक मोहम्मद अकील शेख (३२) असल्याचे समोर आले. जोडलेल्या मोबाईल क्रमांकांचे लोकेशन धारावी परिसरात आढळल्याने सायबर पथकाने आरोपीला ९० फिट रोड परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे साथीदार विजयकुमार पटेल (३२,बिहार), राजेंद्र विधाते (५०,नाशिक) यांची नावे समोर आली. दोघांनाही ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातून अटक झाली. राज्यभरातील विविध व्यक्तींच्या नावे बनावट पद्धतीने बँक खाती उघडून त्याची किट, यूजर आयडी, पासवर्ड, डेबिट कार्ड, चेकबुक हे त्यांच्या चौथ्या साथीदाराला पुरविले जात असल्याचे उघड झाले. त्यानुसार अक्षय कणसे (३३) याला घाटकोपरमधून ताब्यात घेण्यात आले. चौघांना न्यायालयाने २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
यूपीमधून व्हायचे ऑपरेट ...
उत्तर प्रदेशमधील म्होरक्याच्या सूचनांवर ही साखळी काम करत होती. शेखचा युनिफॉर्म तयार करण्याचा धारावीत कारखाना आहे. त्याने ५ टक्के कमिशनवर आपल्या खात्याचा एक्सेस ठगांना दिला होता. बँक खात्याचा किट मिळताच तो पुढे बिहारच्या पटेलकडे सोपविण्यात येत होता. पुढे पटेल हा डाटा विधातेला शेअर करायचा. टार्गेट फिक्स झाल्यानंतर एपीके फाईल संबंधिताच्या खात्यात शेअर करण्याची जबाबदारी कणसेकडे होती. त्याद्वारे तो खात्यावर ताबा मिळवत माहिती पुढे द्यायचा. तो दहा टक्के कमिशनवर हे काम करत होता. आतापर्यंत त्यांना किती पैसे मिळाले? ही टोळी कोण ऑपरेट करत होते? त्याचा शोध सुरू आहे.