NIA Raid on Dawood Gang: ‘एनआयए’चे ऑपरेशन दाऊद; २९ ठिकाणी छापे; सलीम फ्रूटसह चार ताब्यात, चाैकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 06:39 IST2022-05-10T06:39:24+5:302022-05-10T06:39:38+5:30
एनआयएला मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई व दिल्लीतील बड्या मंडळी टार्गेट असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार, मुंबई, ठाण्यात छापे टाकत महत्त्वपूर्ण कागदपत्रे, डिजिटल पुरावे ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू असून, सर्च ऑपरेशनची व्याप्ती वाढू शकते.

NIA Raid on Dawood Gang: ‘एनआयए’चे ऑपरेशन दाऊद; २९ ठिकाणी छापे; सलीम फ्रूटसह चार ताब्यात, चाैकशी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी सकाळपासून मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधितांच्या २९ ठिकाणी छापे टाकले. दहशतवाद्यांना कथितपणे पैसे पुरविणे, मनिलाँड्रिंग, हवाला रॅकेट, अमली पदार्थांची तस्करी, गुन्हेगारी सिंडिकेटमधील संबंधितांच्या ठिकाणी एनआयएने चौकशी केली. या कारवाईमध्ये छोटा शकीलचा नातेवाईक सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट याच्यासह हाजी अली आणि माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवानी व अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबईतील नागपाडा आणि भेंडीबाजारसह पायधुनी, ग्रँटरोड, माहीम, परळ, वांद्रे, सांताक्रूझ, गोरेगाव, बोरिवलीसह ठाण्यातील मुंब्रा अशा २९ अधिक ठिकाणी एनआयएकडून ‘सर्च ऑपरेशन’ करण्यात आले. संबंधित प्रकरणात जवळपास ८० हून अधिक जण एनआयएच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.
‘टेरर फंडिंग’चा दावा
रियल इस्टेट तसेच अन्य माध्यमांतून जमा झालेला पैसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदा या सारख्या दहशतवादी संघटनांना पुरविला जात असल्याचा दावाही एनआयएने केला आहे. तसेच छापा टाकण्यात आलेली सर्व ठिकाणे दाऊदच्या निकटवर्तीयांशी संबंधित असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
स्लिपर सेल
हायप्रोफाइल लोकांचे टेरर फंडिंग करणारे स्लिपर सेल डी कंपनीने तयार केले होते.
काळा पैसा विविध क्षेत्रात गुंतविला जात हाेता, असे एनआयएने म्हटले आहे.
महत्त्वाची कागदपत्रे,
डिजिटल पुरावे जप्त