ऑनलाइन गेमिंगचा वाईट नाद जडला, कर्जाचा डोंगर वाढला; कुटुंबासहित उचललं टोकाचं पाऊल! बाप-लेकीचा मृत्यू अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:08 IST2026-02-26T12:08:10+5:302026-02-26T12:08:32+5:30
झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्यांनी या गेममध्ये तब्बल ४ लाख रुपये गमावले होते.

ऑनलाइन गेमिंगचा वाईट नाद जडला, कर्जाचा डोंगर वाढला; कुटुंबासहित उचललं टोकाचं पाऊल! बाप-लेकीचा मृत्यू अन्..
ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाने एका सुखी कुटुंबाचा अंत केला आहे. मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये कर्जबाजारी झालेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि मुलीलाकोल्ड ड्रिंकमधून विष देऊन स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेत पिता आणि मुलीचा मृत्यू झाला असून, आई मृत्यूशी झुंज देत आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
लाखोंचे कर्ज आणि नशिबाचा जुगार
जुनी वस्ती परिसरात राहणारे शंकर लाल गुप्ता हे ऑनलाइन गेमच्या आहारी गेले होते. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्यांनी या गेममध्ये तब्बल ४ लाख रुपये गमावले होते. बाजारचे कर्ज वाढल्याने आणि आर्थिक तंगीमुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. याच नैराश्यातून त्यांनी संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
नेमकं काय घडलं?
शंकर लाल यांनी पत्नी राजकुमारी आणि १६ वर्षांची मुलगी स्वाती यांना विषमिश्रित कोल्ड ड्रिंक पाजले आणि त्यानंतर स्वतःही ते प्राशन केले. प्रकृती बिघडल्याने तिघांनाही तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मुलगी स्वाती गुप्ता हिचा मृत्यू झाला. मुलीच्या अंत्यसंस्काराहून कुटुंबीय परतत असतानाच, पिता शंकर लाल यांचाही प्राण गेला. पत्नी राजकुमारी गुप्ता सध्या आयसीयूमध्ये गंभीर अवस्थेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
१५ वर्षांचा मुलगा सुदैवाने वाचला
या घटनेवेळी गुप्ता यांचा १५ वर्षांचा मुलगा अनिकेत घराबाहेर होता, त्यामुळे तो सुदैवाने बचावला. मात्र, डोळ्यादेखत वडील आणि बहिणीचा मृत्यू झाल्याने आणि आई रुग्णालयात असल्याने या कोवळ्या जीवावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
मोबाईल दुकानही विकले
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर लाल यांचे अनुपपूर जिल्ह्यात स्वतःचे मोबाईल दुकान होते. मात्र, ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाने त्यांना कर्जबाजारी केले. कर्ज फेडण्यासाठी त्यांना आपले दुकान विकावे लागले. अलीकडे ते रस्त्यावर हेडफोन आणि मोबाईल ॲक्सेसरीज विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पण गेमिंगचे व्यसन सुटले नाही आणि अखेर एका भरल्या संसाराची राखरांगोळी झाली.