एकतर्फी प्रेमातून त्याने महिलेला एका दिवसांत केले 511 कॉल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 16:16 IST2019-03-26T16:02:56+5:302019-03-26T16:16:25+5:30
बडोद्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेला एका प्रेमवीराने चक्क ५११ कॉल केले आहेत.

एकतर्फी प्रेमातून त्याने महिलेला एका दिवसांत केले 511 कॉल्स
बडोदा - अनोळखी फोनवरून येणारे कॉल्स हे अनेकांसाठी डोकेदुखी ठरत असते. त्यातच एकतर्फी प्रेम करणारे काही प्रेमवीर महिला आणि मुलींना अशा अनोळखी नंबरवरून फोन करून त्रास देत असतात. मात्र बडोद्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेला एका प्रेमवीराने चक्क ५११ कॉल केले आहेत.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार एतल पिल्लई असं या प्रेमवीराचे नाव आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये व्यवसायाने डिस्को जॉकी असलेल्या एतलची भेट पीडित महिलेसोबत झाली होती. एतलने महिलेला त्याचा नंबर देऊन तिच्याकडून तिचा नंबर मागितला होता. डीजे असल्यामुळे कुठली पार्टी असेल तर सांगा असे सांगून त्याने पीडित महिलेशी जवळीक वाढविण्याचा बहाणा शोधला होता. महिलेकडून तिचा नंबर मिळाल्यानंतर तो तिला वारंवार कॉल करून त्रास देऊ लागला. तिच्याशी प्रेमसंबंधासाठी तो दबाव आणू लागला. महिला विवाहित असल्याने तिने त्याला नकार दिला. हे प्रकरण इतक्यावरच न थांबलं नाही. एतलने तिला धमकवायला सुरुवात केली. तिचा पती ऑफिसला निघून गेल्यानंतर एतल तिच्या घराबाहेर येऊन तिला त्रास देऊ लागला. महिलेने पतीला विश्वासात घेऊन त्याच्यासह एतलला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर एतलने तिला नवरा आणि मुलांना जिवे मारण्याची धमकीही दिली. महिला धमक्यांनाही भीक घालत नाही असं लक्षात आल्यावर त्याने 23 मार्च रोजी तिच्या फोनवर सलग 511 वेळा कॉल केले. त्यावेळी मात्र महिलेचा संयम सुटला आणि तिने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी एतलविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सध्या तो फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे आणि लवकरच त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.