प्राचार्यासह एकास २ हजारांची लाच स्वीकारताना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 21:39 IST2021-08-13T21:37:45+5:302021-08-13T21:39:13+5:30
Bribe case : ही कारवाई सेनगाव येथे १३ ऑगस्टला दुपारी पावणेपाचच्या सुमारास करण्यात आली.

प्राचार्यासह एकास २ हजारांची लाच स्वीकारताना पकडले
हिंगोली : जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी एकाकडून दोन हजारांची लाच स्वीकारताना प्राचार्यासह खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई सेनगाव येथे १३ ऑगस्टला दुपारी पावणेपाचच्या सुमारास करण्यात आली.
हत्ता (ता. सेनगाव) येथील महाकाली माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दिलीपकुमार विठ्ठलराव राठोड यांच्यामार्फत तक्रारकर्त्यांने त्यांच्या भाच्याचा जातपडताळणी प्रस्ताव पाठवून दिला होता. भाचा व मुलीची जातपडताळणी कार्यालय हिंगोली येथून प्राचार्य दिलीपकुमार राठोड यांच्या ओळखीने जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्राचार्य राठोड याने तक्रारकर्त्याकडे २ हजारांच्या लाचेची मागणी केली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यावरून एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सापळा लावला. सेनगाव बसस्थानकाजवळील एका मेडिकलमध्ये हनुमान गोरखनाथ रवने (रा. शिंदेफळ) याच्याकडे लाच देण्याचे प्राचार्य राठोड याने सांगितले होते. ही रक्कम हनुमान रवने याने स्वीकारत स्वत:जवळ ठेवत लाच स्वीकारण्यास मदत केली. ही कारवाई पोलीस उपधीकक्षक नीलेश सुरडकर, पोहेकॉ विजय उपरे, पोना तान्हाजी मुंडे, पोना ज्ञानेश्वर पंचलिंगे, पोशि अवि कीर्तनकार, पोना सरनाईक यांच्या पथकाने केली.