शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:47 IST2026-04-09T13:44:09+5:302026-04-09T13:47:26+5:30
आचिर्णेच्या जंगलात नेमके काय घडले, यासाठी पोलिस आता मोबाईल 'सीडीआर' (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) तपासणार आहेत.

शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
वैभववाडी - तालुक्यातील आचिर्णे- घाणेगडवाडी येथील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या दोन तरुणांवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या हल्ल्यात सागर सुरेश पोटळे (३१) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, कृष्णा सुरेश कातकर (२६) हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून शिकारीच्या नावाखाली हा घातपात होता की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १० च्या सुमारास सागर आणि कृष्णा कुर्ली कालव्यानजीक शिकारीसाठी दबा धरून बसले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर थेट गोळीबार केला आणि दर्डेवाडीच्या दिशेने पलायन केले. सागरच्या छातीत गोळी लागल्याने तो जागीच कोसळला तर जखमी कृष्णाने कसाबसा वाडीतील आपल्या मित्रांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली तेव्हा सागर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. दोघांनाही तातडीने ग्रामस्थांनी घरी आणले आणि त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोनी साटम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी रात्रीच आर्चिणेत तळ ठोकला. पोलिसांनी दोघांनाही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र सागरला मृत घोषित करण्यात आले. जखमी कृष्णावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
तलवार आणि विलंबाचे कोडे ?
घटनास्थळी पोलिसांना अडीच ते तीन फुटांची तलवार सापडली आहे. ही तलवार शिकारीसाठी नेली होती की हल्लेखोरांची होती याचा शोध आता पोलिस घेत आहेत. तसेच रात्री १० वाजता घटना घडली असताना पोलिसांना मध्यरात्री १२ वाजता माहिती का दिली गेली? या दोन तासांच्या विलंबामागे नेमके काय घडले आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, याचा उलगडा होणे आवश्यक आहे.
अंधारातील 'त्या' वर्णनावर संशय
जखमी कृष्णाने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी पांढरा टी-शर्ट आणि काळी हाफ पैंट घातली होती. मात्र रात्रीच्या किर्रर्र अंधारात आणि खांद्याला गोळी लागून जखमी अवस्थेत असतानाही कृष्णाला हल्लेखोरांच्या कपड्यांचा रंग इतक्या स्पष्टपणे कसा दिसला? या विसंगत माहितीमुळे पोलिस आता सर्व बाजूंनी या घटनेची पडताळणी करत आहेत.
'सीडीआर'मधून बाहेर येणार सत्य!
आचिर्णेच्या जंगलात नेमके काय घडले, यासाठी पोलिस आता मोबाईल 'सीडीआर' (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) तपासणार आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेले लोक आणि त्यानंतरच्या दोन तासांत झालेल्या संभाषणातून अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी फॉरेन्सिक आणि श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे.