Crime News: शिकाऱ्यांचीच झाली शिकार, गोळी लागून एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, तर तिसरा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 18:29 IST2022-01-26T18:28:47+5:302022-01-26T18:29:31+5:30
Crime News: जंगलात शिकार करण्यासाठी गेलेल्या शिकाऱ्यांचीच शिकार झाल्याची विचित्र घटना हिमाचल प्रदेशमध्ये घडली आहे. हिमाचल प्रदेशमधील सिरमौर जिल्ह्यात गोळी लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Crime News: शिकाऱ्यांचीच झाली शिकार, गोळी लागून एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, तर तिसरा अटकेत
सिमला - जंगलात शिकार करण्यासाठी गेलेल्या शिकाऱ्यांचीच शिकार झाल्याची विचित्र घटना हिमाचल प्रदेशमध्ये घडली आहे. हिमाचल प्रदेशमधील सिरमौर जिल्ह्यात गोळी लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. जंगलामध्ये शिकारीसाठी गेले असताना ही घटना घडली. जखमी व्यक्तीला नाहन मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
सिरमौरमधील पांवटा साहिब उपविभागातील सैनवालाच्या जंगलामध्ये झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच डीएसपी पोलिसांची टीम घेऊन घटनास्थळावर पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार पांवटा साहिबच्या सेनवालाच्या जंगलात मंगळवारी रात्री उशिरा तीन शिकारी शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी दोघेजण एकत्र होते. तर एकजण एकटा होता.
दरम्यान, समोरून आवाज आल्यावर एकाने जनावर समजून गोळीबार केला. यामध्ये रामेश्वर नावाच्या व्यक्तीचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर गीतराम गंभीर जखमी झाला. गोळीबाराचा आवाज ऐकताच आसपासच्या लोकांनी जंगलात धाव घेतली. त्यांनी पाहिले तेव्हा रामेश्वर आणि गीतराम रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. गीतरामला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पांवटा साहिबचे डीएसपी वीर बहादूर यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पांवटा साहिबचे डीएसपी वीर बहादूर यांनी घटनेला दुजोरा देत या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे आणि एकजण गंभीर जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी जगन्नाथ याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.