हॉटेल व बसचा व्यवसायासाठी गुंतवणूक करण्यास सांगून एक कोटी १९ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 14:11 IST2020-01-24T14:11:36+5:302020-01-24T14:11:41+5:30
बँकेचे खोटे स्टेटमेंट फिर्यादी यांना दाखवून ते खरे असल्याचे भासवून एक कोटी १९ लाख ५० हजारांची फसवणूक

हॉटेल व बसचा व्यवसायासाठी गुंतवणूक करण्यास सांगून एक कोटी १९ लाखांची फसवणूक
पिंपरी : हॉटेल व बसचा व्यवसाय करण्यासाठी गुंतवणूक करण्यास सांगून करारनामा करून दोघांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी एक कोटी १९ लाख ५० हजारांची फसवणूक केली. तसेच गुंतवणूकदारास जिवे मारण्याची धमकीही दिली. खराळवाडी, पिंपरी येथे १८ मे ते ४ नोव्हेंबर २०१९ दरम्यान फसवणुकीचा हा प्रकार घडला.सुनील शिवराम शिंदे (वय ५१, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संजय नारायण पवार व सुवर्णा संजय पवार (दोघेही रा. राजे शिवाजीनगर, चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यावत आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर हॉटेल व बसच्या व्यवसायाचा करारनामा केला. त्यानंतर रेलरॅकच्या व्यवसायासाठी आरटीजीएस व रोख रक्कम घेऊन ती रक्कम इतरत्र गुंतवून व्यवसायातून आलेल्या नफ्याचा हिशेब न देता नफा झाल्याबाबत फिर्यादी यांना मोबाइलवर मेसेज पाठविला. तसेच बँकेचे खोटे स्टेटमेंट फिर्यादी यांना दाखवून ते खरे असल्याचे भासवून एक कोटी १९ लाख ५० हजारांची फसवणूक केली. तसेच गुंतवलेल्या रकमेची व नफ्याची मागणी केली असता आरोपींनी फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.