‘वन क्लिक’चा कोट्यवधींचा गैरव्यवहार, ऑफर्सचा बनाव; २ हजार गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन संस्थापक पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 05:52 IST2025-11-28T05:51:32+5:302025-11-28T05:52:16+5:30
वडाळा परिसरात राहणाऱ्या मधुरा महेश भोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

‘वन क्लिक’चा कोट्यवधींचा गैरव्यवहार, ऑफर्सचा बनाव; २ हजार गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन संस्थापक पसार
मुंबई - टोरेस घोटाळ्यापाठोपाठ दादरमध्ये आणखी एक विविध ऑफर्सच्या नावाखाली सुरू असलेला स्कॅम उघडकीस आला आहे. यामध्ये सुमारे दोन हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप असून, फसवणुकीच्या रकमेचा आकडा सव्वाचार कोटींवर पोहचला आहे. याप्रकरणी वन क्लिक मल्टिट्रेड संस्थेच्या संस्थापक संस्थापक नामदेव बाबाजी नवले व सहकारी अलका दीपक महाडिक यांच्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा गुन्हा दाखल केला आहे.
वडाळा परिसरात राहणाऱ्या मधुरा महेश भोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अलका हिने त्यांच्या घरी येऊन ‘वन क्लिक मल्टिट्रेड’ या योजनेची माहिती दिली. दर महिना हजार रुपये २० महिने गुंतविल्यानंतर २१व्या महिन्यांत २५ हजार परतावा आणि महिन्याच्या १६ तारखेला लकी ड्रॉ अशा आमिषांवर भोळे यांनी विश्वास ठेवून या योजनेत गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांनाही एजंट केले. दादरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरात याचे कार्यालय होते.
सुरुवातीला सर्व देयके एप्रिल २०२५ पर्यंत सुरळीत मिळत होती, मात्र त्यानंतर पैसे मिळण्यास बंद झाले. विचारणा केल्यावर नवले यांनी पैसे शेअर मार्केटमध्ये अडकले, अशी कारणे देत वेळ मारून नेली. काही दिवसांतच दादर येथील कार्यालय बंद केले.
अशी झाली फसवणूक
भोळेंच्या अंतर्गत ८२ सदस्यांनी ८ लाख १९ हजार रुपये भरले. ज्यातील २५ हजार रुपये सोडता कोणताही परतावा मिळाला नाही. त्यांच्यासारख्या ३२ जणांनी या ऑफर्ससाठी गुंतवणूकदारांची साखळी तयार केली. यामध्ये सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त ठेवीदारांकडून गोळा केलेली रक्कम ४ कोटी ४१ लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कार्यालय भाडेतत्त्वावर
नवले हा दोन ते तीन वर्षांपासून अशाप्रकारे फसवणूक करत असल्याचा संशय आहे. वेगवेगळ्या ठिकाणी भाडेतत्त्वावर कार्यालय घेत फसवणूक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दोघेही पसार असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. भोईवाडा ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) नितिन महाडिक या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.