काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांकडून परप्रांतीयावर हल्ला, स्थानिक नागरिकाचीही हत्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 22:18 IST2022-03-21T22:17:10+5:302022-03-21T22:18:02+5:30
जम्मू-काश्मीरमधील बडगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सोमवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली आणि एका परप्रांतीय व्यक्तीला जखमी केलं आहे.

काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांकडून परप्रांतीयावर हल्ला, स्थानिक नागरिकाचीही हत्या!
जम्मू-काश्मीरमधील बडगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सोमवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली आणि एका परप्रांतीय व्यक्तीला जखमी केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य काश्मीरच्या बडगाममधील गोथपोरा भागात संध्याकाळी 7.20 वाजता दहशतवाद्यांनी तजमुल मोहिउद्दीन राथेरच्या घरात घुसून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. जखमीला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
दुसरीकडे, पुलवामा जिल्ह्यातील दुसऱ्या घटनेत बिहारमधील रहिवासी बिसुजित कुमार याच्यावरही सर्कुलर रोडवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. त्याला जखमी अवस्थेत पुलवामा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याआधी, रविवारीच पुलवामामध्ये एका मजुरावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. हल्ल्यानंतर सुतार मोहम्मद अक्रम (40) यांना जवळच्या रुग्णालयात आणि नंतर एसएमएचएस रुग्णालयात नेण्यात आलं. अकरम हा उत्तर प्रदेशातील बिजनौरचा रहिवासी असून तो पुलवामाच्या अरिहालमध्ये फर्निचरचं काम करतो.
गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये नागरिकांवरील हल्ले वाढले आहेत. मार्चमध्ये दहशतवादी हल्ल्यात पंचायत सदस्यांसह अनेक लोक मारले गेले होते.