CBI च्या तक्रारीच्या आधारे समीर वानखेडे यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 06:43 AM2024-02-11T06:43:37+5:302024-02-11T06:44:28+5:30

आर्यन खान अटक प्रकरण, धक्कादायक गोष्ट म्हणजे, ५० लाख रुपयांची लाच वानखेडे व त्यांच्या पथकाने स्वीकारल्याचा ठपकाही सीबीआयने ठेवला आहे.

On the basis of CBI's complaint, ED filed a case against Sameer Wankhede | CBI च्या तक्रारीच्या आधारे समीर वानखेडे यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

CBI च्या तक्रारीच्या आधारे समीर वानखेडे यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

मुंबई : कॉर्डिलिया क्रुझवर सापडलेल्या अमली पदार्थ प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप झाल्यानंतर अडचणीत आलेल्या समीर वानखेडे यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली असून आता त्या प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. वानखेडे यांच्यासोबत त्यावेळी एनसीबीमध्ये कार्यरत असलेल्या अन्य काही अधिकाऱ्यांनाही ईडीने समन्स जारी केल्याचे समजते. 

२००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी असलेल्या समीर वानखेडे यांच्याविरोधात गेल्यावर्षी मे महिन्यात सीबीआयने गुन्हा नोंदवला होता. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने आता मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  मे महिन्यात सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर वानखेडे यांच्या मुंबईतील ओशिवरा येथील निवासस्थानासह दिल्ली, रांची, कानपूर, लखनौ, गुवाहाटी, चेन्नई अशा एकूण २९ ठिकाणी छापेमारी केली होती. तसेच, त्या दरम्यान सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील कार्यालयात त्यांची चौकशीही केली होती. 

धक्कादायक गोष्ट म्हणजे, ५० लाख रुपयांची लाच वानखेडे व त्यांच्या पथकाने स्वीकारल्याचा ठपकाही सीबीआयने ठेवला आहे. आर्यन खान प्रकरणात लाचखोरी झाल्याचा तपास करण्यासाठी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) सीबीआयला लेखी पत्र लिहिले होते. 
वानखेडे यांच्यासोबत एनसीबीतील तत्कालीन अधीक्षक विश्व विजय सिंह, एनसीबीतील गुप्तचर अधिकारी आशीष रंजन, आर्यन खानच्या अटकेनंतर त्याच्यासोबतचा फोटो व्हायरल करणारा आणि या प्रकरणातील पंच किरण गोसावी व अन्य काही जणांविरोधात हा गुन्हा सीबीआयने दाखल केला आहे.

एनसीबीच्या मुंबईतील विभागीय संचालकपदी असताना समीर वानखेडे यांनी ३ ऑक्टोबर २०२१ रोजी कॉर्डिलिया क्रुझवर छापेमारी केली होती. यावेळी तेथून अमली पदार्थांचा साठा जप्त करतानाच त्या क्रूझवर जाणाऱ्या आर्यन खान यालादेखील अटक केली होती. मात्र, त्याला अटक न करण्यासाठी वानखेडे आणि त्यांच्या पथकाने २५ कोटींची लाच मागितल्याचा ठपका सीबीआयने त्यांच्यावर ठेवला आहे.

ईडीने ईसीआयआर २०२३ मध्ये नोंदवला आहे. सीबीआयने जो एफआयआर दाखल केला आहे त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे त्या एफआयआरच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केला ही आश्चर्याची बाब आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मला या संदर्भात अधिक भाष्य करायचे नाही. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सत्यमेव जयते.    - समीर वानखेडे, आयआरएस अधिकारी

आर्यनच्या प्रकरणातदेखील त्यांनी अनेक प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्या नसल्याचा ठपका त्यांच्यावर होता. या प्रकरणी त्यांच्यासह एनसीबीच्या सात अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी झाली होती. यानंतर एनसीबीने सीबीआयला पत्र लिहून वानखेडे व त्यांच्या पथकातील लोकांची भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी करण्यास सांगितले होते. या प्रकरणी आर्यन खान २२ दिवस तुरुंगात होता. मात्र, मे २०२२ मध्ये आर्यन खान याच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती. 

Web Title: On the basis of CBI's complaint, ED filed a case against Sameer Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.