लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 14:37 IST2025-05-09T14:33:33+5:302025-05-09T14:37:51+5:30
Crime News : लग्नाच्या १५ व्या दिवशीचं नव्या नवरीनं पतीदेवाला आणि त्याच्या कुटुंबाला असा धक्का दिला की, त्यातून सावरणं कुटुंबासाठी कठीण झालं आहे.

लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...
राजस्थानच्या सवाई माधोपुरमधील मानटाउन भागातून एका नववधूने केलेल्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांतच या नव्या नवरीने घरातील सगळं सामान घेऊन पळ काढला आहे. मानटाउन परिसरातील आयएचएस कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. या कॉलनीमध्ये राहणाऱ्या विष्णु शर्मा नावाच्या तरुणाने मध्य प्रदेशच्या अनुराधा यादव या तरुणीशी विवाह २० एप्रिल २०२५ रोजी मंदिरात लग्न केले. दोघांचे लग्न पप्पू मीना या मध्यस्थाच्या माध्यमातून झाले होते. या लग्नासाठी वर पक्षाने वधू पक्षाला दोन लाख रुपये देखील देऊ केले होते. दोघांनी लग्नाआधी या संदर्भात कागदोपत्री व्यवहार देखील केला होता.
लग्नाच्या पहिले दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने गेले. या दरम्यान, अनुराधा ही पती आणि सासरच्या कुटुंबासोबत संसारात रुळली होती. मात्र, लग्नाच्या १४व्या रात्री, ३ मेला तिने संपूर्ण कुटुंबाच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर दोन वाजताच्या सुमारास सगळेच बेशुद्धावस्थेत असताना अनुराधाने घरातील ३० हजार रुपयांची रोकड, सोन्याची अंगठी, मंगळसूत्र, कानातले, चांदीचे पैंजण आणि एक मोबाईल फोन घेऊन घरातून पळ काढला. अनुराधाने घरातील जवळपास २.५ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला.
नवरदेवाची पोलिसांत धाव
पत्नीचे कारनामे लक्षात येताच पती विष्णु शर्मा याने पोलिसांत धाव घेत अनुराधा यादव, मध्यस्थी पप्पू मीना, सुनिता यादव आणि श्याम राजपूत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. विष्णु याच्या कुटुंबाचा भाजी विकण्याचा व्यवसाय आहे. विष्णुने कर्ज काढून लग्न केलं होतं. तर, पत्नी जो मोबाईल घेऊन पसार झाली, तो देखील त्याने मित्राकडून घेतला होता.
आधीच रचला होता कट
विष्णु लग्नासाठी मुलीच्या शोधत होता, मात्र त्याला सुयोग्य तरुणी मिळत नव्हती. या दरम्यान त्याची ओळख पप्पू मीनाशी झाली. पप्पूनेच अनुराधा आणि विष्णु यांची भेट घडवून आणली. मुलीचे वडील नसल्याचे कारण देऊन, भेटीच्या दुसऱ्याच दिवशी दोघांचे मंदिरात लग्न लावले गेले. यावरून ही योजना आधीच रचली गेली असावी, असा संशय विष्णुने व्यक्त केला. आता पोलीस फरार वधू आणि तिच्या साथीदारांच्या शोधात आहेत.