दिल्ली मेट्रो स्टेशनवर सापडलं ५०० आणि १००० च्या जुन्या नोटांचं घबाड; आकडा पाहून पोलीस हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 08:32 IST2025-12-11T08:30:19+5:302025-12-11T08:32:35+5:30
या जुन्या नोटा आरबीआयकडून बदलल्या जाऊ शकतात असं खोटं सांगून आरोपी लोकांची फसवणूक करत होते.

दिल्ली मेट्रो स्टेशनवर सापडलं ५०० आणि १००० च्या जुन्या नोटांचं घबाड; आकडा पाहून पोलीस हैराण
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठं यश हाती लागले आहे. शालीमार बाग मेट्रो स्टेशनच्या गेटनंबर ४ जवळ केलेल्या एका कारवाईत ३.५ कोटीहून अधिक रक्कमेच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. हे ते चलन आहे जे ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीनंतर बाद झाले होते. या कारवाईत पोलिसांनी ४ लोकांना अटक केली. ज्यात हर्ष, टेकचंद, लक्ष्य आणि विपिन कुमार यांचा समावेश आहे.
माहितीनुसार, पोलिसांना मिळालेल्या गुप्तमाहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. ज्यात ५०० आणि हजाराच्या जुन्या नोटांचा बेकायदेशीर सौदा होणार असल्याचं कळलं होते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने एक टीम बनवली. ज्यांनी छापेमारी करत रंगेहाथ आरोपींना पकडले. या आरोपींकडून नोटांचे बंडल सापडले. ज्यांना ते अत्यंत माफक दरात खरेदी करून पुढे विकण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी या कारवाईत आरोपींसोबत त्यांनी वापरलेल्या २ कारही जप्त केल्या आहेत.
आरोपींच्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक सत्य समजले. या जुन्या नोटा आरबीआयकडून बदलल्या जाऊ शकतात असं खोटं सांगून आरोपी लोकांची फसवणूक करत होते. कमी दरात ते लोकांकडून पैसे खरेदी करायचे. नोटबंदीनंतर हे चलन वापरणे आणि बाळगणे कायद्याने गुन्हा आहे हे आरोपींना माहिती होते. आरोपींकडे या जुन्या नोटांबाबत कुठलाही पुरावा अथवा दस्तावेज नव्हता. नोटाबंदीनंतर अशा नोटा ठेवणे, खरेदी करणे किंवा विकणे हे विशिष्ट बँक नोट्स कायद्यांतर्गत दंडनीय गुन्हा आहे. याआधारे पोलिसांनी आरोपींवर फसवणूक, षडयंत्र आणि नोटाबंदी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आरोपींसोबत या षडयंत्रात आणखी कुणी सहभागी आहे का, इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर चलन त्यांच्याकडे कसे पोहचले याचा शोध पोलीस घेत आहेत. नोटाबंदीच्या इतक्या वर्षानंतरही जुन्या नोटांशी निगडीत गुन्हेगारी टोळी सक्रीय आहे हे दिल्ली पोलिसांच्या कारवाईतून दिसते. दिल्लीतील या कारवाईनंतर पोलिसांनी इतर ठिकाणीही शोध मोहिम हाती घेतली आहे. ज्यातून हे संपूर्ण रॅकेट उघडकीस येईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.