जुनी नोट, जुने नाणे आणि १२ लाखांचे स्वप्न भंगले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:37 IST2025-08-06T13:35:46+5:302025-08-06T13:37:24+5:30
एका महिलेला जुनी नोट, नाणे यांच्या बदल्यात १२ लाख देण्याच्या मोहात पाडून तब्बल ८ लाख ४६ हजारांचा गंडा घालण्यात आला आहे.

जुनी नोट, जुने नाणे आणि १२ लाखांचे स्वप्न भंगले!
मुंबई : जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याचा छंद काहींसाठी मौल्यवान ठरतो, तर काहींसाठी फसवणुकीचे कारणही बनू शकते, असे एक प्रकरण माझगावमध्ये समोर आले आहे. एका महिलेला जुनी नोट, नाणे यांच्या बदल्यात १२ लाख देण्याच्या मोहात पाडून तब्बल ८ लाख ४६ हजारांचा गंडा घालण्यात आला आहे.
तक्रारदार महिलेने जुलै महिन्यात कामाच्या सुटीदरम्यान मोबाइलवर एक जाहिरात पाहिली. त्यात ‘तुमच्याकडे जुनी नोट किंवा नाणे आहे का? आम्हाला द्या आणि त्याबदल्यात लाखो रुपये मिळवा!’ असे सांगण्यात आले होते. राज गियानी नावाच्या तरुणाने ही जाहिरात दिली होती. सदर महिलेच्या संग्रहात एक विशेष ७८६ क्रमांकाची जुनी शंभराची नोट आणि गेंड्याच्या चित्राचे दुर्मीळ २५ पैशांचे नाणे होते. दोन्हींचे फोटो त्यांनी व्हॉट्सॲपवर राजला पाठवले. राजने त्यांना ‘या दोन्ही गोष्टी खूपच दुर्मीळ आहेत.
आम्ही तुम्हाला प्रत्येकी ६ लाख, म्हणजे एकूण १२ लाख रुपये देऊ शकतो,’ असे सांगितले. अचानक मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या आशेने महिला भारावून गेली; पण पुढे विविध नावाखाली राजने त्यांच्याकडून ८ लाख ४६ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले; पण प्रत्यक्षात पैसे खात्यावर जमा होण्याऐवजी खाते रिकामे झाले. राजही नॉट रिचेबल झाल्याने त्यांना धक्काच बसला. त्यांनंतर त्यांनी पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.