श्वास गुदमरल्याने झाला ‘त्या’ वृद्धेचा मृत्यू, लेकीने दिला मृतदेह स्वीकारण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 21:23 IST2020-02-26T21:09:53+5:302020-02-26T21:23:27+5:30
डी. एन. नगर हत्याप्रकरण : शेट्टी यांचा मृतदेह रविवारी रात्री हातपाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत घरात सापडला होता.

श्वास गुदमरल्याने झाला ‘त्या’ वृद्धेचा मृत्यू, लेकीने दिला मृतदेह स्वीकारण्यास नकार
मुंबई - अंधेरीत गुलाबी नारायण शेट्टी (७५) या महिलेची अनोळखी व्यक्तीने हत्या केली. सुरुवातीला आईचा मृतदेह स्वीकारण्यास मुलीने नकार दिला होता, मात्र नंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेट्टी यांचे शवविच्छेदन सोमवारी रात्री उशिरा करण्यात आले. त्याच्या अहवालात शेट्टी यांचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाल्याची माहिती डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांनी दिली.
गुलाबी शेट्टी यांची हत्या झाल्याचे मुलीला कळविण्यात आले तेव्हा ती घटनास्थळी दाखल झाली. मात्र तिने आईचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर नातेवाईक आणि पोलिसांनी तिची समजूत काढली व तिच्याच उपस्थितीत रात्री उशिरा शेट्टी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेट्टी यांचा मृतदेह रविवारी रात्री हातपाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत घरात सापडला होता.
या हत्येप्रकरणी अनेक संशयितांना चौकशीसाठी बोलावून त्यांचे जबाब नोंदवत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. शेट्टी ज्या ठिकाणी राहात होत्या तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. घरातील सामान इतरत्र पसरलेले अथवा झटापट झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे त्यांची हत्या करणारी व्यक्ती त्यांच्या परिचयातील असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.