ऑनलाईन गेमचा नाद लय बेक्कार! खेळण्यापासून रोखल्याने मुलाने केली आई-वडील, बहिणीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:48 IST2025-03-05T13:48:20+5:302025-03-05T13:48:48+5:30

ऑनलाईन गेम खेळू देण्यास नकार दिला म्हणून एका विद्यार्थ्याने त्याच्या पालकांची आणि बहिणीची निर्घृण हत्या केली.

odisha jagatsinghpur youth kills parents and sister for opposing his addiction to online games | ऑनलाईन गेमचा नाद लय बेक्कार! खेळण्यापासून रोखल्याने मुलाने केली आई-वडील, बहिणीची हत्या

ऑनलाईन गेमचा नाद लय बेक्कार! खेळण्यापासून रोखल्याने मुलाने केली आई-वडील, बहिणीची हत्या

आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन गेम तरुणांची पहिली पसंती ठरत आहेत. एडव्हेंचर, अ‍ॅक्शन आणि मल्टीप्लेअर गेम्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मुलं तासन्तास स्क्रीनसमोर बसत आहेत. ऑनलाईन गेममुळे अनेक धक्कादायक घटनाही घडल्या आहेत. ओडिशातील जगतसिंहपूर जिल्ह्यातूनही असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन गेम खेळू देण्यास नकार दिला म्हणून एका विद्यार्थ्याने त्याच्या पालकांची आणि बहिणीची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री ३ वाजता जगतसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जयबाडा सेठी साही येथे घडली.

पोलीस अधीक्षक भवानी शंकर उद्गाता यांनी सांगितलं की, आरोपी विद्यार्थ्याने त्याच्या पालकांच्या आणि बहिणीच्या डोक्यावर दगड किंवा एखाद्या कठीण वस्तूने वार केले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. प्राथमिक तपासात असं दिसून आलं की, पालकांनी मुलाला ऑनलाईन गेम खेळण्यास मनाई केली होती, ज्यामुळे तो संतापला आणि त्याने हे भयानक पाऊल उचललं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

जगतसिंगपूर पोलीस स्टेशनचे एसएचओ प्रभास साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, आरोपी सूर्यकांत सेठी (२१) हा त्याच्या पालकांवर आणि बहिणीवर रागावला होता कारण त्यांनी त्याला त्याच्या मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळण्यापासून रोखलं होतं. प्रशांत सेठी उर्फ ​​कालिया (६५), त्यांची पत्नी कनकलता (६२) आणि मुलगी रोझलिन (२५) अशी मृतांची नावं आहेत.

घटनेनंतर सूर्यकांत सेठी गावाजवळ लपला होता. नंतर त्याला अटक करण्यात आली. मुलगा मानसिक समस्येने ग्रस्त असल्याचा संशय आहे. याच दरम्यान, स्थानिक आमदार अमरेंद्र दास यांनी सांगितलं की, जमिनीच्या वादाबद्दल कुटुंबातील सदस्य एकदा त्यांच्याकडे आले होते. गावकऱ्यांनी असा दावा केला की, सूर्यकांतने त्यांच्याकडे त्याच्या पालकांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
 

Web Title: odisha jagatsinghpur youth kills parents and sister for opposing his addiction to online games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.