खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 11:59 IST2025-09-19T11:58:36+5:302025-09-19T11:59:13+5:30
अमजद आपल्या पत्नीशी गोड बोलला, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि नंतर चाकू काढून तिच्यावर हल्ला केला.

फोटो - आजतक
ओडिशातील बालासोर शहर पोलीस हद्दीतील पठाण मोहल्ला येथे एका धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने भररस्त्यात आपल्या पत्नीचा गळा चिरला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कटकमधील बक्षी बाजार येथील रहिवासी शेख अमजद हा आपल्या पत्नीला भेटायला आला होता. लग्नानंतर झालेल्या वादामुळे ती बालासोरमध्ये वेगळी राहत होती. दुपारी ४:३० च्या सुमारास दोघे रस्त्याच्या कडेला गप्पा मारताना दिसले. अमजद आपल्या पत्नीशी गोड बोलला, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि नंतर चाकू काढून तिच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली.
बाल्कनीतून कोणीतरी संपूर्ण घटनेचे व्हिडीओ काढला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्थानिक लोकांनी महिलेला उपचारासाठी बालासोर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल केलं. तिची प्रकृती आणखी बिघडल्याने तिला कटकमधील एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे.
घटनेनंतर लगेचच रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी अमजदला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात दोघांमध्ये खूप दिवसांपासून वाद असल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.