उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील बीबी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातून, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे प्रेम प्रकरणात असलेल्या एका तरुणीने बॉयफ्रेंडच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संबंधित तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. यात तिने आपली संपूर्ण कहाणीच सांगितली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या आई विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, पीडित तरुणीचे शेजारच्या गावातील राकेश शर्मा नावाच्या तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू होते. त्या दोघांमध्ये शारीरिक संबंधही होते. आरोपीने तिचा अश्लील व्हिडिओ देखील बनवला होता. दरम्यान, तरुणीच्या कुटुंबाने तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी निश्चित केले होते. ३ मार्च रोजी हे लग्न होणार होते. यासंदर्भात माहिती मिळताच तरुणीच्या प्रियकराने तिच्या लग्नाला विरोध करण्यास सुरुवात केला. तसेच संबंधित अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेलही करू लागला होता. त्या बदल्यात त्याने पीडितेकडून अनेक वेळा पैसेही घेतले.
दुसरीकडे लग्नाची तारीख जवळ येत असल्याचे पाहून आरोपी राकेश शर्माने त्याच्या प्रेयसीच्या होणाऱ्या पतिला फोन केला. त्याला त्यांची संपूर्ण प्रेमकहाणी सांगितली. याचा राग येऊन संबंधित नवरा मुलाने लग्न मोडले. यामुळे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ झाले. याचा संबंधित तरुणीलाही धक्का बसला. तिने घरात ठेवलेले थिनर अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले. स्थानिक रुग्णालयात उपचारानंतर तिला मेरठला नेण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झाला.
मृत पीडितेचे वडील रामकिशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. पण राकेश शर्माच्या ब्लॅकमेलिंगमुळे ती अस्वस्थ होती. त्याने त्याचा व्हिडिओ बनवला होता. तो तिला ब्लॅकमेल करायचा. त्याने तिच्याकडून ५० हजार रुपये घेतले होते. यानंतरही तो पैसे मागत राहिला. त्याने त्याच्या भावी जावयालाही फोन केला होता.
सीओ सिकंदराबाद पूर्णिमा सिंह यानी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून राकेश शर्मा आणि त्याच्या आईविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार आहे. मात्र त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे. पीडितेचे तिच्या शेजारी नगला अग्रसेन गावातील राकेश शर्माशी प्रेमसंबंध होते, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तसेच पीडितेने लिहिलेली एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.