कुख्यात साहिलची पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 19:45 IST2020-07-18T19:43:37+5:302020-07-18T19:45:25+5:30
पिस्तुलाच्या धाकावर एका तरुणाच्या जबरदस्तीने सह्या घेऊन कोट्यवधीची मालमत्ता हडपल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलीस ठाण्यात कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कुख्यात साहिलची पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पिस्तुलाच्या धाकावर एका तरुणाच्या जबरदस्तीने सह्या घेऊन कोट्यवधीची मालमत्ता हडपल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलीस ठाण्यात कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शशांक नथुजी चौधरी (वय ३१) असे या प्रकरणातील पीडित व्यक्तीचे नाव असून ते वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर जवळच्या शेगाव येथील रहिवासी आहेत. चौधरी यांच्या तक्रारीनुसार सुरेंद्र नगरातील सेंट्रल रेल्वे एम्प्लाईज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडमध्ये ही मालमत्ता आहे. या मालमत्तेची मालकी प्रशांत चौधरी यांच्याकडे होती. ती हडपण्यासाठी आरोपी साहिल सय्यद, गिरीश गिरधर, संदीप बनसोड आणि त्याच्या तीन साथीदारांनी बनावट कागदपत्रे बनविली. मूळ मालकाचे मृत्युपत्र बनवून त्यावर बनावट सही केली. त्यानंतर चौधरी यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली. डोक्यावर पिस्तुल लावून जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या समझोता पत्रावर सही आणि अंगठा घेतला. नंतर संदीप बनसोड यांच्या नावावर ही मालमत्ता करण्यात आली. या प्रकरणी चौधरी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा आवाज दाबण्यात आला. दरम्यान, साहिलच्या पापाचा घडा फुटल्यामुळे त्याच्या विरुद्ध गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका लावला. त्यामुळे चौधरी यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला.
चौथा गुन्हा
साहिल विरुद्ध दाखल झालेला हा चौथा गुन्हा आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध गुन्हेगारी षड्यंत्र रचून नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये फसविण्याचा कट रचणे, स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न करणे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता हडपण्याच्या आरोपांवरून तहसील मानकापूर तसेच पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.