२१ वर्षांपासून फरार पारधी टोळीतील कुख्यात आरोपीला अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 18:23 IST2024-12-21T18:23:12+5:302024-12-21T18:23:34+5:30
मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी

२१ वर्षांपासून फरार पारधी टोळीतील कुख्यात आरोपीला अटक!
- मंगेश कराळे
नालासोपारा : घरफोडी करुन चाकुचा धाक दाखवुन जबरी चोरी करणाऱ्या पारधी टोळीतील कुख्यात फरार आरोपीला २१ वर्षानंतर जालना जिल्ह्यातून अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी दिली आहे.
९ जानेवारी २००३ रोजी आगाशी येथील सुहास पाटोळे याचे साई कुटीर या बंद बंगल्याचे तळमजल्यावरील खिडकीचे ग्रील तोडुन त्यावाटे चार आरोपींनी घरात प्रवेश केला. त्यांना काठीने दोन्ही पायावर फटके मारुन चाकुचा धाक दाखवून दोन्ही हात पाठीमागे बांधून डोक्यावर ब्लॅकेट टाकुन घरातुन १ लाख ३३ हजार २०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व २५ हजार रोख रक्कम असा माल जबरीने चोरून नेला. तसेच सदर गुन्हा केलेनंतर लागलीच जवळ असलेल्या अंतोन डाबरे याचे बंद घराचे खिडकीचे ग्रील तोडुन त्यातुन घरात प्रवेश करुन साक्षीदारांना काठीने मारहाण करुन जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याच्या तपासात आरोपी सुचिनाथ ऊर्फ राजेश पवार याला सन २००५ मध्ये अटक करुन त्याचे विरुद्ध दोषारोपपत्र सादर केले होते. परंतु गुन्ह्यातील फरार आरोपी बबऱ्या उर्फ बाबुराव काळे, बाबुरावचा मित्र आणि श्याम काळे यांचे गुन्हयाचे तपासात परीपूर्ण नांव, पत्ता निष्पन्न झाले नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर व संवेदनशील गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्याचे आदेश केले होते. हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने फरार आरोपी यांचा यापूर्वी सर्वोतोपरी शोध घेऊन देखील ते गेल्या २१ वर्षापासुन मिळुन येत नव्हते. त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी राहुल राख यांनी सपोनि दत्तात्रय सरक, पोहवा. शिवाजी पाटील, महेश वेल्हे, हनुमंत सूर्यवंशी, साकेत माघाडे, नितीन राठोड असे तपास पथक तयार केले होते.
या पथकाने गुन्ह्याची माहिती घेऊन गेल्या २ महिन्यांपासून सतत अहोरात्र मेहनत घेवून तपासात सातत्य ठेवून आरोपीची माहीती घेतली. आरोपी बाबुराव काळे हा त्याचे राहते गावी असल्याचे कळले. या पोलीस पथकाने आरोपीच्या मुळ गावी जावुन बातमीदार व आरोपीचे मोबाईल फोनचे तांत्रीक विश्लेषणावरून तो त्याचे गांवातील शेतातील घरात राहत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा लावुन आरोपी बाबुराव काळे ऊर्फ बबऱ्या (५५) याला १९ डिसेंबरला सव्वा बारा वाजता शिताफिने ताब्यात घेतले. आरोपीवर परतूर, औरंगाबाद याठिकाणी पूर्वीचे १० गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे व सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पो.निरी. राहुल राख, सपोनिरी. दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, पोउपनिरी. हितेंद्र विचारे, सहापोउपनिरी. श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोहवा. शिवाजी पाटील, महेश वेल्हे, हनुमंत सुर्यवंशी, राजाराम काळे, संतोष मदने, सतिष जगताप, राजविरसिंग संधु, अनिल नागरे, संग्रामसिंग गायकवाड, प्रविणराज पवार, गोविंद केंद्रे, साकेत माघाडे, नितीन राठोड, अंगद मुळे, आकील सुतार, मसुब सचिन चौधरी, सफौ. संतोष चव्हाण यांनी केली आहे.