Noida Crime: हुंडाबळी रोखण्यासाठी कडक कायदे केले जात असताना, दुसरीकडे मालमत्तेच्या हव्यासापोटी एका तरुण मुलीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोनिका नागर (२२) असे मृत तरुणीचे नाव असून, तिच्या कुटुंबाने पती अनुज चौहान आणि त्याच्या कुटुंबीयांवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोनिका आणि अनुज यांचे प्रेमसंबंध होते. १७ फेब्रुवारी रोजी दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते. मात्र, मोनिकाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची जमीन आणि मालमत्ता होती. मोनिकाच्या नातेवाईकांनी आरोप केला की, अनुजने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केवळ पैशांसाठी लग्न केले होते. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच तिला छळण्यास सुरुवात झाली. तिच्या नावावर असलेली मालमत्ता सासरच्या नावावर करण्यासाठी तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता.
मृत्यूपूर्वीचा तो शेवटचा फोन कॉल...
नातेवाईक अनिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी २ वाजता मोनिकाने रडत रडत घरी फोन केला होता. "अनुज आणि त्याचे घरचे मला मारहाण करत आहेत, जमिनीचे कागदपत्रे नावावर केली नाहीत तर मला जिवंत मारून टाकू अशी धमकी देत आहेत," असे तिने कुटुंबाला सांगितले होते. फोन येताच मोनिकाची आई तातडीने तिच्या घराकडे रवाना झाली. रात्री ८ च्या सुमारास त्या तिथे पोहोचल्या तेव्हा घराबाहेर मोठी गर्दी जमली होती.
डोळ्यादेखत लेकीचा मृतदेह गाडीत टाकला!
मोनिकाच्या आईने पाहिले की, अनुज आणि त्याचे नातेवाईक मोनिकाचा मृतदेह एका कारमध्ये ठेवत होते. त्यांनी तातडीने त्या गाडीचा पाठलाग केला. एका रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मोनिकाला मृत घोषित केले. आईने जेव्हा त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी त्यांनाही मारहाण करून तिथून पळ काढला.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
या प्रकरणात पीडित कुटुंबाने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. घटनेची माहिती देऊनही पोलिसांनी लगेच कारवाई केली नाही, असा त्यांचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे तासाभरानंतर पोलिसांनी कुटुंबाला सांगितले की मोनिकाचा मृतदेह जाळण्यात आला असून फक्त काही अवशेष उरले आहेत, ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी
या घटनेनंतर मोनिकाच्या कुटुंबीयांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्याय मागितला आहे. आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. "जर आम्हाला न्याय मिळाला नाही, तर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि तीव्र आंदोलन करू," असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मोनिका लग्नापूर्वी तिच्या आईसोबत भाड्याने राहत होती. कोर्ट मॅरेजला दोन्ही कुटुंबांची संमती होती. मात्र, छळ होत असल्याचा मेसेज तिने भावाला पाठवला होता. सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.