Nirbhaya Case : तिहार तुरुंगात चौघांना एकत्र फासावर लटकवून 'हा' जल्लाद मोडणार पणजोबांचा रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 18:44 IST2020-01-13T18:39:52+5:302020-01-13T18:44:07+5:30
२२ जानेवारीला सकाळी सात वाजता या चौघांना फासावर लटकवले जाणार आहे आणि त्याची तयारी देखील सुरु आहे.

Nirbhaya Case : तिहार तुरुंगात चौघांना एकत्र फासावर लटकवून 'हा' जल्लाद मोडणार पणजोबांचा रेकॉर्ड
मेरठ - पूर्वजांचा वारसा म्हणून कोणाला संपत्ती मिळते तर कोणाला चांगले संस्कार मिळतात. उत्तर प्रदेशातील मेरठ या शहरातील एका व्यक्तीला वारसा म्हणून घराण्याचे परंपरेने चालत आलेले 'जल्लाद'चे काम मिळाले आहे. अशी चर्चा आहे की, याच कुटुंबातील पवन जल्लादची ही चौथी पिढी तिहार तुरुंगात निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशी देणार आहे. २२ जानेवारीला सकाळी सात वाजता या चौघांना फासावर लटकवले जाणार आहे आणि त्याची तयारी देखील सुरु आहे.
देशात या कुटुंबातल्या लोकांना जल्लादांचं कुटुंब म्हणून ओळखले जाते. १९५० - ६० च्या दशकात या कुटुंबातील पहिल्या पिढीचे प्रमुख लक्ष्मण हे देशातील दोषींना फाशी देण्याचं काम करत होते. आता त्यांचा पणतू म्हणजेच लक्ष्मण यांचा मुलगा कालू राम जल्लाद यांच्या मुलाचा मुलगा पवन जल्लाद म्हणजेच या कुटुंबाची चौथी पिढी आयुष्यातली पहिली फाशी देण्याची तयारी करण्यात व्यस्त आहे.
पाच दोषींच्या फाशीची आजोबांना केली होती मदत
पवन जल्लादने याआधी जवळपास पाच फाशींमध्ये आजोबा कालू राम जल्लाद यांची मदत केली होती. त्या पाच फाशींच्या वेळी पवन यांनी फाशी देण्याच्या प्रक्रियेतले सर्व बारकावे आजोबा कालू राम यांच्याकडून शिकून घेतले होते. आता निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फासावर लटकवणं हा पवन जल्लादसाठी पहिलाच अनुभव असणार आहे.
हा माझ्या पूर्वजांचा आशीर्वाद
पवन जल्लाद म्हणाले की, 'मी तयार आहे. हा माझ्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे. पूर्वजांनी आयुष्यात एका वेळीच एका किंवा दोन दोषींना फाशी दिली होती. मी माझ्या आयुष्यात पहिल्याच वेळी एकत्र चार-चार दोषींना फासावर लटकवणार आहे.'
Nirbhaya Case: 'मी पाच मुलींचा बाप, निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवून समाधान मिळेल': जल्लाद पवन
चार दोषींना एकत्र फाशी देण्याची संधी
तिहार तुरुंगाच्या इतिहासातच नव्हे तर भारताच्या इतिहासात आजतागायत कोणत्याही जल्लादने एकत्र चार - चार दोषींना फाशी दिलेली नाही. त्यामुळे हे पवन जल्लादच्या नशिबी आल्याने ते खुश आहेत.