अँटिलिया स्फोटके -हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने वाझेवर दाखल केले दोषारोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 23:09 IST2021-09-03T23:08:31+5:302021-09-03T23:09:51+5:30
अँटिलिया स्फोटके व व्यावसायिक मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यावर दोषारोपपत्र सादर केले.

अँटिलिया स्फोटके -हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने वाझेवर दाखल केले दोषारोपपत्र
मुंबई : अँटिलिया स्फोटके व व्यावसायिक मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यावर दोषारोपपत्र सादर केले. एनआयएने शुक्रवारी विशेष न्यायालयात हे दोषारोपपत्र सादर केले.
सचिन वाझे याच्यासह एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा , विनायक शिंदे, नरेश गोर, रियाझुद्दीन काझी, सुनील माने, आनंद जाधव, सतीश मतकरी, मनीष सोनी आणि संतोष शेलार यांच्यावर ९००० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोनच दिवसांपूर्वी एनआयएने दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने गेल्या महिन्यात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएल ३० दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपण्यापूर्वी एनआयएने विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
मुकेश अंबानी यांच्या निवसस्थानाजवळ २५ फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही सापडली. ती एसयूव्ही सचिन वाझे यानेच तिथे ठेवल्याचा दावा एनआयएने केला. तसेच या एसयूव्हीचा मालक व ठाण्यातील व्यवसायिक मनसुख हिरेन याची हत्या करण्यामागेही वाझे याचा हात असल्याचा दावा एनआयएने केला आहे. या सर्व आरोपींवर हत्या करणे, कट रचणे, अपहरण, स्फोटकांबाबत निष्काळजीपणे वागणे तसेच यूएपीए, एक्सप्लोझिव्ह सबस्टान्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या आरोपपत्रात २०० साक्षीदारांची यादी आहे. महाराष्ट्र पोलिसांनी तीन वेगवेगळे दाखल केलेले गुन्हे एनआयएने एकत्र केले आहेत. दक्षिण मुंबई, विक्रोळी आणि मुंब्रा येथे नोंदवलेल्या गुन्ह्यांना एकत्र करण्यात आले आहे. तपासद्यपही सुरूच असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे.