भाचाच निघाला मारेकरी; जुन्या वैमनस्यातून नायब तहसीलदाराची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 06:02 PM2021-03-19T18:02:10+5:302021-03-19T18:03:20+5:30

Murder Case : आरोपीला यवतमाळातून अटक  

The nephew is the killer; Assassination of Deputy Tehsildar out of old enmity | भाचाच निघाला मारेकरी; जुन्या वैमनस्यातून नायब तहसीलदाराची हत्या

भाचाच निघाला मारेकरी; जुन्या वैमनस्यातून नायब तहसीलदाराची हत्या

googlenewsNext
ठळक मुद्दे पवन श्रीराम मंगाम (३३, रा. लोहारा, यवतमाळ) असे आरोपी भाच्याचे नाव आहे. मृत मोहन पेंदुरकर हे यवतमाळ येथील विश्वशांतीनगरचे रहिवासी होते.

महागाव (यवतमाळ) : येथील तहसील कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले नायब तहसीलदार (संजय गांधी निराधार योजना) मोहन पेंदुरकर (५९) यांचा त्यांच्याच भाच्याने जुन्या वैमनस्यातून खून केला. आरोपीला पोलिसांनीयवतमाळातूनअटक केली आहे.

 
पवन श्रीराम मंगाम (३३, रा. लोहारा, यवतमाळ) असे आरोपी भाच्याचे नाव आहे. मृत मोहन पेंदुरकर हे यवतमाळ येथील विश्वशांतीनगरचे रहिवासी होते. गुरुवारी रात्री फुलसावंगीनजीक पिंपळगाव फाटा येथे त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यावरून घातपाताची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर हा खूनच असल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, ठाणेदार विलास चव्हाण यांच्या सतर्कतेने आरोपीला केवळ चार तासांमध्ये अटक करण्यात आली.


पवन मंगाम याच्या कुटुंबासोबत पेंदूरकर यांचा जुना वाद होता. त्या वादाचा वचपा काढण्यासाठी पवन गेल्या काही दिवसांपासून मामाची हत्या करण्याची संधी शोधत होता. मामा मदत करीत नसल्याने त्यांचा काटा काढण्याची योजना त्याने तयार केली होती. गुरुवारी सायंकाळी पवन हा महागाव येथे मोहन पेंदुरकर यांच्याकडे  तहसील कार्यालय परिसरातील शासकीय निवासस्थानी आला होता. मामाने काही दिवसांपूर्वी घेतलेली जुनी कार (एम.एच. २० सी.एच. ०८४०) शिकविण्याच्या बहाण्याने ते दोघेही ५.३० वाजता महागाव ते फुलसावंगी रस्त्यावर गेले. पिंपळगाव फाटा येथे या दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. आरोपी पवनने सोबत आणलेल्या कैचीने मामाच्या छाती आणि डोक्यात सपासप वार केले. त्यामुळे पेंदुरकर जागीच रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले. ते मृत झाल्याची खात्री होताच आरोपीने सरळ यवतमाळ येथे पोबारा केला होता.


तातडीने फिरविली तपास चक्रे
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे यांनी तातडीने चक्रे फिरविली. प्रथम पेंदुरकर यांचा  अपघाती मृत्यू झाल्याची वार्ता पसरली होती. मात्र, घटनास्थळावर कोणतेही वाहन आढळून आले नाही. सवना येथे पेंदुरकर यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता, आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार असल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच १० वाजता आरोपीला यवतमाळ येथून कारसह अटक करण्यात आली. रात्री १ वाजता त्याला महागाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपीने खुनाची कबुली दिल्याचे ठाणेदार विलास चव्हाण यांनी सांगितले. आरोपीविरुद्ध भादंवी ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे ठाणेदार विलास चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: The nephew is the killer; Assassination of Deputy Tehsildar out of old enmity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.