उस्मानाबादेत सभागृहात तोडफोड प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरूध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:42 IST2018-09-15T16:41:19+5:302018-09-15T16:42:36+5:30
तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक माणिक बनसोडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला

उस्मानाबादेत सभागृहात तोडफोड प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरूध्द गुन्हा दाखल
उस्मानाबाद : नगराध्यक्षांच्या टेबलावरील दूरध्वनीची तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक माणिक बनसोडे यांच्याविरूध्द शुक्रवारी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना उस्मानाबाद नगर पालिकेच्या सभागृहात १० सप्टेंबर रोजी दुपारी विशेष सभा सुरू असताना घडली होती़
उस्मानाबाद नगर पालिकेत १० सप्टेंबर रोजी दुपारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती़ या सभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आजची सभा रद्द करून उद्या घ्यावी, नगराध्यक्षांनी जाहीर केल्याप्रमाणे सभा जनतेसमोर घ्यावी किंवा इनकॅमेरा घ्यावी या मागण्या लावून धरल्या होत्या़ सभा सुरू असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक माणिक बनसोडे यांनी अचानक नगराध्यक्षांच्या टेबलावरील दूरध्वनी उचलून फेकून देत त्याची तोडफोड केली़.या घटनेनंतर नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़
नगराध्यक्षांच्या कक्षात बैठक सुरू असताना टेबलावरील दूरध्वनी फोन जनतेस व कोणत्याही व्यक्तीला गैरहानी किंवा नुकसान पोहोचविण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक सार्वजनिक मालमत्ता फेकून देवून फोडून नुकसान करीत आगळीक केल्याचे नगराध्यक्षांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ या फिर्यादीवरून माणिक बनसोडे यांच्याविरूध्द सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शुक्रवारी विधी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि एस़जी़दासरवाड हे करीत आहेत़