२ मुलांसह आईचा संशयास्पद मृत्यू, जावयावर आरोप; सासऱ्याच्या पत्रानं गूढ वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 13:18 IST2023-10-09T13:17:43+5:302023-10-09T13:18:29+5:30

पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा आतमध्ये तिघांचे मृतदेह सापडले. त्यांच्या मनगटावर कापल्याच्या खूणा होत्या

NCB constable's wife, 2 children found dead in Delhi home, The mystery increased with the father-in-law's letter | २ मुलांसह आईचा संशयास्पद मृत्यू, जावयावर आरोप; सासऱ्याच्या पत्रानं गूढ वाढलं

२ मुलांसह आईचा संशयास्पद मृत्यू, जावयावर आरोप; सासऱ्याच्या पत्रानं गूढ वाढलं

नवी दिल्ली – दक्षिण पश्चिम दिल्लीच्या मुनिरकामध्ये रविवारी एका घरात महिला आणि तिच्या २ मुलांचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. मृत महिलेच्या मनगटावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खूणा आढळल्या. मृत महिलेचे नाव वर्षा शर्मा असून तिच्या २ लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुनिरका येथे एका फ्लॅटमध्ये २७ वर्षीय विवाहिता वर्षा शर्मा आणि तिच्या अडीच वर्ष आणि ४ वर्षाच्या २ मुलांचा मृतदेह सापडला. वर्षाचा पती जोगेंद्र शर्मा हा नार्कोटिक्स डिपार्टंमेंटमध्ये कॉन्स्टेबल आहे. ही घटना ८ ऑक्टोबरची असून सकाळी १०.३० वाजता हा प्रकार समोर आला. मुनिरका भागातून पोलिसांना एक कॉल आला त्यात महिलेने घरात आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तातडीने पोलिसांची टीम घटनास्थळी पोहचली.

पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा आतमध्ये तिघांचे मृतदेह सापडले. त्यांच्या मनगटावर कापल्याच्या खूणा होत्या. प्राथमिकदृष्ट्या महिलेने आधी २ मुलांचा खून करून स्वत: आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. परंतु यामागचं कारण काय? हे कुणालाही माहिती नव्हते. परंतु संध्याकाळी जेव्हा मृत महिलेच्या वडिलांनी ४ पानी तक्रार पोलिसांना सोपावली तेव्हा या घटनेमागचे रहस्य उलगडले. तक्रारीत मृत महिलेच्या वडिलांनी जावई जोगेंद्र आणि मुलगी वर्षाच्या नात्यावर भाष्य केले.

जावई जोगेंद्र हा तंत्रमंत्र, पूजापाठ, नशा करणे, मारहाण करून हुंड्यासाठी संपूर्ण कुटुंबाला त्रास देत होता असा गंभीर आरोप वडिलांनी केला. अद्याप मृत महिलेच्या वडिलांचा जबाब नोंदवणे बाकी आहे. जबाबानंतर पोलीस या घटनेत गुन्हा नोंद करणार आहेत. दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून क्राईम इन्वेस्टिगेशन टीम आणि एफएसएल टीम एकत्रितपणे फ्लॅटची तपासणी करणार आहे. वर्षाने आधी २ मुलांना मारले त्यानंतर आत्महत्या केली असावी असं प्रत्येकाला वाटतंय. तरीही पोलीस सर्व अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तक्रारीत काय म्हटलंय?

लग्नानंतर जावई आणि त्याच्या घरातले हुंड्यासाठी वर्षाला त्रास देत होते. जोगेंद्र मुरादाबादला राहायचा. अनेकदा भांडणे झाल्यावर तो वर्षाला माहेरी दिल्लीला घेऊन यायचा. वर्षाने फोनवर सांगितले होते की, तिचा पती बाहेर नशेची औषधे खायला द्यायचा. जेव्हा ती शुद्धीत नसायची तेव्हा तिच्यावर तंत्र-मंत्र केले जायचे. हे एकदा नव्हे अनेकदा केले आहे. वर्षाच्या वडिलांनी जावयाला फोनवर विचारणा केली असता त्याने वर्षावर भूत चढलंय. ज्यामुळे पूजा-पाठ केला जात आहे असं जावई म्हणायचा. तसेच ही आत्महत्या नसून विचार करून केलेली हत्या आहे. जोगेंद्रने पत्नी आणि मुलांना मारले असा आरोप करण्यात आला आहे.

Web Title: NCB constable's wife, 2 children found dead in Delhi home, The mystery increased with the father-in-law's letter