नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक, नौपाडा पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 01:05 IST2020-01-20T01:05:33+5:302020-01-20T01:05:51+5:30
मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये (बीएआरसी) नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक

नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक, नौपाडा पोलिसांची कारवाई
- जितेंद्र कालेकर
ठाणे : मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये (बीएआरसी) नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या अमृत मंडले (रा. सावरकरनगर, ठाणे) आणि रविराज चव्हाण (रा. वायफळे, तासगाव, जि. सांगली) या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांना २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मंडले आणि रविराज यांच्यासह पाच जणांनी कोल्हापूर (कळंबा) येथील तानाजी देसाई या लष्कारातील माजी सैनिकाच्या मुलाला बीएआरसीमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून चार लाख ७५ हजारांची रक्कम घेतली होती. गेल्या वर्षभरात त्यांच्या मुलाला नोकरीला न लावता पैसेही परत न केल्याने अखेर त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ६ जानेवारी २०२० रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मंडले यांच्या टोळीने आतापर्यंत २० ते २५ जणांना ६० ते ७० लाखांचा गंडा घातला आहे. तो अशाच प्रकारे नोकरीला लावण्याच्या नावाखाली एका तरुणाकडून पैसे घेण्यासाठी ठाण्यात येणार असल्याची टीप पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली लबडे यांच्या पथकाने ठाण्यातील तीन हात नाका येथून १७ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी मंडले याला अटक केली.
त्याच्या चौकशीतून त्याचा आणखी एक साथीदार रविराज चव्हाण यालाही १८ जानेवारी रोजी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. या दोघांसह पाच जणांच्या टोळक्याने बीएआरसीमध्ये बड्या अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याचे भासवून लष्करातील माजी सैनिक तानाजी देसाई यांच्याकडून पैसे उकळले.
कोल्हापूरला तक्रार
आमिष दाखवल्याप्रमाणे कुठेही नोकरी लागली नाही. त्यांचे पैसेही या टोळीने परत न केल्याने अखेर याप्रकरणी कोल्हापूरच्या राजावाडी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली. ही तक्रार ६ जानेवारी रोजी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी याची गांभीर्याने दखल घेतली.