नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:03 IST2025-07-21T17:59:24+5:302025-07-21T18:03:17+5:30
Nalasopara Crime News: २८ वर्षीय चमन देवी आपल्या २० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार

नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
Nalasopara Crime News | लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): काही दिवसांपूर्वी राजा रघुवंशी आणि सोनम यांची एक बातमी प्रचंड चर्चेत होती. सोनमने आपला पती राजा रघुवंशी याची हत्या करण्यासाठी प्रियकर राज कुशवाह याला सुपारी दिली होती. हे प्रकरण ताजे असतानाच, महाराष्ट्रात नालासोपारा येथे असाच एक प्रकार घडला. नालासोपारा शहराच्या धानीवबाग परिसरात एक धक्कादायक घटना घडली. आरोपी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरात पुरला. इतकेच नव्हे तर त्या मृतदेहावर त्यावर नवीन टाईल्स लावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला आहे. पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गुन्ह्याचा तपास करत आहे.
धानीवबागच्या गांगडीपाडा येथील साईशारदा वेल्फेअर सोसायटीत राहणाऱ्या विजय चौहान (३४) यांची हत्या करण्यात आली. त्यांची पत्नी चमन देवी (२८) आणि प्रियकर मोनू शर्मा (२०) याच्या मदतीने ही निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह घरातच पुरला गेला. धक्कादायक म्हणजे मृतदेह पुरल्यावर त्यावर टाईल्स देखील लावण्यात आल्या. हा प्रकार १५ दिवसांनी उघड झाला. आरोपी पत्नी ही प्रियकरासोबत फरार झाली असून पेल्हार पोलीस तपास करत आहे.
कसे उघडकीस आले प्रकरण?
अखिलेश चौहान (२४) याने रविवारी रात्री भाऊ विजयचा शोध घेऊनही काही पत्ता लागत नसल्याने पेल्हार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. शेजारी राहणाऱ्या प्रियकर मोनू सोबत आरोपी चमन देवी पळून गेल्याची माहिती विजयचा भाऊ अखिलेश याने दिली. तसेच त्या परिसरातील मोबाईलवाला सर्वेश गिरी याचाही यात सहभाग असल्याचा आरोपही त्याने केला.
जमिनीतून वास येत असल्याने मृतदेह जमिनीत असल्याचे समजले. पण मनपा डॉक्टर, कर्मचारी, तहसीलदार, फॉरेन्सिक एक्सपर्ट आल्याशिवाय जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढता येणार नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांची टीम घटनास्थळी असून तपास व आरोपींचा शोध घेत आहे.
- जितेंद्र वनकोटी, (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)