बदल्याची आग! बॉयफ्रेंडने दिला धोका, मुलाच्या अपहरणाचा कट; ५ मुलांच्या आईने घेतला सूड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:49 IST2025-03-31T18:48:48+5:302025-03-31T18:49:33+5:30
एका मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल करताना पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

फोटो - आजतक
बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मनियारी पोलीस स्टेशन हद्दीतील जमरुआ गावात एका मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल करताना पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता मुलाच्या आईलाच अटक केली आहे. पाच मुलांच्या या आईने तिच्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी अपहरणाचा खोटा कट रचला होता. पण पोलिसांनी तिचा कट उधळून लावला आणि मुलाला शोधून काढलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ जानेवारी रोजी रेणू देवी नावाच्या महिलेने मुझफ्फरपूरच्या मनियारी पोलीस ठाण्यात तिच्या मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. तक्रारीत तिने वैशाली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कौशल कुमार आणि अभिषेक कुमार या दोन ओळखीच्या लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला. पोलिसांनी १९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. सर्वप्रथम आरोपींचं लोकेशन शोधलं.
आवश्यक माहिती आणि पुरावे गोळा केल्यानंतर, पोलिसांनी आरोपी नंबर एक कौशल कुमारला बोलावलं. त्याच्याशी झालेल्या संभाषणानंतर भलतीच माहिती समोर आली. आरोपीने सांगितलं की त्याचे त्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो तिला नियमितपणे पैसे पाठवत असे. पण काही महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झाल्यामुळे तिने त्याच्यासोबतचे नातं संपवलं. त्याला त्या महिलेवर मुलाचं अपहरण केल्याचा संशय होता. या प्रकरणाबाबत पोलीसही आता अधिक सतर्क झाले.
पोलिसांसमोर धक्कादायक सत्य
रेणू देवीच्या मागे पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलं. ती तिच्या आईवडिलांच्या घरी पोहोचली तेव्हा पोलिसांनी तिथे छापा टाकला. पोलिसांसमोर एक धक्कादायक सत्य समोर आलं. महिलेने ज्या मुलाचं अपहरण झाल्याचा आरोप केला होता तो तिच्या बहिणीसोबत तिच्या माहेरी होता. पोलीस पथकाने महिलेला पोलीस ठाण्यात आणलं. तिची कसून चौकशी केली असता तिने संपूर्ण सत्य सांगितलं. तिने प्रेमसंबंधाची कबुली दिली आणि कट रचल्याचं उघड झालं.
प्रियकरासोबत करायचं होतं लग्न
रेणू देवी यांनी पोलिसांना सांगितलं की, तिला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं होतं. पण त्याने तिला फसवलं आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. तिला याच हे खूप वाईट वाटलं. त्याला धडा शिकवण्यासाठी तिने हा कट रचला. यानंतर तिने आपल्या मुलाला बहिणीकडे पाठवलं आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तिचा प्रियकर बंगळुरूमध्ये काम करतो. तिला वाटत होतं की, पोलिसांनी त्याला अटक करावी आणि बिहारला आणावं जेणेकरून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल.