इंदापूर : पूर्ववैमनस्यातून हॉटेलचालक तरुणासह त्याच्या कामगारावर धारदार हत्यारांनी हल्ला चढवत त्याचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास इंदापूरमधील आयटीआय जवळ घडली. या घटनेत तरुणाचा कामगार जखमी झाला आहे. त्याच्या मोटारसायकलला मोटार आडवी घालून हा हल्ला करण्यात आला असून चार ते पाच हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब दत्तात्रय शेलार (वय २४, रा. कासबापेठ, इंदापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. कामगार जावेद शेखहा गंभीर जखमी झाला आहे. या संदर्भात प्रविण दत्तात्रय शेलार (वय २२) यांनी फिर्याद दिली आहे.सुमित रघुनाथ जामदार याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०१८ च्या पहिल्या आठवड्यात प्रविण शेलारचे निलेश मल्हारी बनसुडे (रा. कसबा पेठ, इंदापूर) व त्याच्या मित्रांसोबत पुर्ववैमनस्यातून भांडणे झाली होती. त्यावेळी बनसुडे याने फिर्यादीच्या पोटात चाकु मारला होता. झटापटीत बनसुडे याच्याही हाताला चाकू लागला होता.दोघांनाही इंदापूरच्या शासकीय दवाखान्यात उपचारांसाठी नेण्यात आले होते. प्रवीणचा भाऊ बाळासाहेब हा रुग्णालयात आल्यावर बनसुडेच्या अंगावर धाऊन गेला होता. भांडणे सोडवित असताना सुमित रघुनाथ जामदार (रा. कसबा पेठ, इंदापूर), सोमनाथ मच्छिंद्र चव्हाण (रा. मोडनिंब, सोलापूर) यांनाही बाळासाहेब याच्याकडून मार लागला होता. यासंदर्भात त्याने जमादारची माफीही मागीतली होती. चव्हाण काही दिवस कोमामध्ये होते. भांडणे झाल्यानंतर दिवाळीच्या दिवसात फिर्यादी व बाळासाहेब शहाबाज राजू शेख (रा. रामवेस, इंदापूर) असे रामवेस चौकात उभे असताना जामदार याने, ‘तु माझा मावस भाऊ सोमनाथला मारले आहेस. त्यामुळे त्याच्या दवाखान्याला १० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. ते पैसे मी खर्च केले आहेत. ते तु मला दे नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही! तुला कायमचा संपवेन आणि मी माझ्या बाजुने पुरावे गोळा करून सही सलामत बाहेर सुटेन’ अशी धमकी दिली होती. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास हॉटेल कामगार शेख याने फिर्यादीला फोन करुन सरस्वतीनगर येथे आयटीआय समोर जामदार व अनोळखी ४ ते ५ इसम यांनी स्कॉर्पिओ सारख्या गाडी आडवी घालून धारदार हत्यारांनी दोघांवर वार केल्याचे सांगत लवकर येण्यास सांगितले. फिर्यादीने मित्रांना फोन करून घटनास्थळी बोलावले. त्यावेळी बाळासाहेब हा रक्ताचा थारोळयात पडलेला दिसला. दोघांनाही इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, बाळासाहेब याचा उपचारांपुर्वीच मृत्यू झाला होता.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे करीत आहेत. ......................... इंदापूर शहरामध्ये दोन दिवस तणावपूर्ण वातावरण रविवारी सायंकाळी ६. ४५ वाजता घटना झाल्यानंतर, ७ वाजता इंदापूर शहरात उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी मयत आणल्यानंतर २०० ते ३०० तरुणांनी एकच गर्दी केली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी इंदापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर सदर गुन्ह्यातील आरो पींना त्वरित अटक करण्यात यावी यासाठी इंदापूर पोलीस ठाण्यात ४०० ते ५०० तरुणांची व मयताच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती त्यामुळे इंदापूर शहरात दोन दिवस तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते.
इंदापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा वार करुन खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 17:44 IST
पूर्ववैमनस्यातून हॉटेलचालक तरुणासह त्याच्या कामगारावर धारदार हत्यारांनी हल्ला चढवत त्याचा खून करण्यात आला.
इंदापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा वार करुन खून
ठळक मुद्देतणावपूर्ण वातावरण : जुन्या भांडणाचा मनात राग धरून हत्त्या