पूर्ववैमनस्यातून दगडी पाटा डोक्यात घालून तरुणाचा खून; चिंचवड येथील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 16:02 IST2020-08-22T16:01:37+5:302020-08-22T16:02:53+5:30
धारदार शस्त्राने वार तसेच दगडी पाटा डोक्यात मारत केले होते गंभीर जखमी..

पूर्ववैमनस्यातून दगडी पाटा डोक्यात घालून तरुणाचा खून; चिंचवड येथील धक्कादायक घटना
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून धारदार शस्त्राने वार केले. तसेच दगडी पाटा तरुणाच्या डोक्यात घातला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विद्यानगर, चिंचवड येथे हनुमान मंदिरासमोर शनिवारी (दि. २२) ही घटना घडली.
शंकर गोविंद सुतार (वय २३, रा. हनुमान मंदिरासमोर, विद्यानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष चौगुले (वय २५), अजय कांबळे (वय २३), मोसीन शेख (वय २५), पप्पू पवार (वय २८, सर्वांचे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नीला गोविंद सुतार (वय ४५) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा शंकर सुतार व आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग आरोपी यांच्या मनात होता. शंकर सुतार हा रात्री हनुमान मंदिरासमोर झोपला. त्यावेळी रात्री सव्वाबाराच्या सुमारास आरोपी तेथे आले. झोपेत असलेल्या शंकर याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच दगडी पाटा डोक्यात मारला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला पिंपरीतील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, शंकर याच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी यांनी तेथील दोन वाहनांची तोडफोड केली. या वेळी पाऊस सुरू असल्याने कोणी बाहेर नसल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर आरोपी तेथून पळून गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.