साखरपुड्याच्या आदल्या दिवशी तरुणाचा खून, पुण्याच्या कर्वेनगरमधील घटना; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 22:36 IST2021-12-26T22:12:13+5:302021-12-26T22:36:10+5:30
सोमवारी सायंकाळी साखरपुडा असताना आदल्या दिवशी सायंकाळी तरुणावर तलवारीने वार करुन त्याचा खून करण्याची धक्कादायक घटना सायंकाळी कर्वेनगरमध्ये घडली.

साखरपुड्याच्या आदल्या दिवशी तरुणाचा खून, पुण्याच्या कर्वेनगरमधील घटना; नेमकं काय घडलं?
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोमवारी सायंकाळी साखरपुडा असताना आदल्या दिवशी सायंकाळी तरुणावर तलवारीने वार करुन त्याचा खून करण्याची धक्कादायक घटना सायंकाळी कर्वेनगरमध्ये घडली.
अनिल राजेंद्र जाधव (वय २१, रा. डहाणुकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता कर्वेनगरमधील शक्ती चौक परिसरात घडली. खूनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जाधव याचा सोमवारी सायंकाळी साखरपुडा होता. त्याची बहीण फक्कड हॉटेल येथे स्वयंपाकी म्हणून काम करते. तिला सोडायला अनिल दुचाकीवरुन लक्ष्मीनगर परिसरात आला होता. त्यानंतर तो पुन्हा घरी जात होता. शक्ती चौक येथे तो आला असताना तिघा जणांनी अचानकपणे त्याच्यावर तलवारीने डोक्यावर, खांद्यावर सपासप वार केले. तेव्हा त्याने दुचाकी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. काही अंतर तो धावत गेला. त्याच्यामागोमाग हल्लेखोरांनी पाठलाग करुन त्याच्यावर वार केले. त्यात तो तेथेच कोसळला. तेथेच त्याचा मृत्यु झाला. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पाठोपाठ अलंकार पोलीस व गुन्हे शाखेचे पोलीस पथक घटनास्थळी पोहचले.
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी अनिल जाधव याच्यावर पाळत ठेवून हा हल्ला केल्याचे दिसून येत आहे. अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे अधिक तपास करीत आहेत.
राजेंद्र जाधव याच्या आईचे ६ महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्याला ४ बहिणी असून त्यातील तिघींचा विवाह झाला आहे. वडिलांशी पटत नसल्याने तो बहिणीकडे रहात होता. तो मिळेल ते काम करीत होता. अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.