उल्हासनगरात रक्षाबंधनाच्या दिवशी तरुणाची हत्या, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 22:01 IST2018-08-27T22:00:38+5:302018-08-27T22:01:48+5:30
उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
_201707279.jpg)
उल्हासनगरात रक्षाबंधनाच्या दिवशी तरुणाची हत्या, एकाला अटक
उल्हासनगर : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची तिघांनी निर्घृण हत्या केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
शहरातील खेमानी परिसरात राहणारा चंद्रकांत (चंदू) मोरे कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करतो. रक्षाबंधनाची सुटी असल्यामुळे चंदू हा खेमानी येथे चायनीज खाऊन येतो, असे चुलत भाऊ मुकेश याला सांगून घरा बाहेर पडला. रात्री साडेआठच्या सुमारास विकी व कर्तारसिंग या दोन मित्रांसोबत खेमानीला गेल्यानंतर, सार्वजनिक ठिकाणी हे तिघेजण लघुशंका करत होते. त्यावेळी काही तरुणांनी त्यांना हटकले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर दोन्ही गट निघून गेले. मात्र, काही वेळात दुसऱ्या गटाने चंदुला गाठत धारधार चाकुने पोटावर वार करून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चंदूला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चंदूवर उपचार सुरू असताना, प्रकृती गंभीर झाल्याने त्याला कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. याप्रकरणी एकाला अटक केली आहे.